औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यभर लॉकडाउन लावण्यात आले होते. आता कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असून कोरोना पूर्णपणे घालवण्यासाठी लसीकरण सुरू आहे. 18 वर्षावरील मुलांना लस सुरू झाल्यानंतर लसीकरणाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. परंतु केंद्र शासनाकडून लसींचा पुरवठा मोजक्याच प्रमाणात मिळत असल्याने दुसरा डोस घेणारे 70 हजारांहून अधिक नागरिक वेटिंगवर आहेत.
सोमवारी रात्री मनपाला 5000 डोस मिळाले होते. ते डोस मंगळवारी सकाळी दीड ते दोन तासात संपले. यामुळे आज लसीकरण बंद असणार आहे. त्याचबरोबर काही दिवस लसींचा साठा नसल्यामुळे लसीचा पहिला डोस बंद ठेवण्यात येणार आहे. पहिला डोस घेऊन 84 दिवस पूर्ण झालेल्यांना आता दुसऱ्या लसची प्रतीक्षा लागलेली आहे. परंतु आठवड्यातून एक किंवा दोन वेळेसच लसीकरण होत आहे. शहरात दररोज 20 हजार लस देण्याची यंत्रणा मनपाने उभी केली असून शासनाकडून लसींचा साठा उपलब्ध होत नसल्यामुळे 115 पैकी 39 ते 40 लसीकरण केंद्रे सुरू ठेवण्यात येत आहेत.
आरोग्य केंद्रावर कोरोनाचा दुसरा लस घेण्यासाठी पहाटे पाच वाजताच रांगा लागतात. प्रत्येक केंद्राला दीडशे लोक देण्यात येत असून सकाळी टोकन घेण्यासाठी नागरिकांची गर्दी बघायला मिळते. परंतु लसीचा साठा नसल्यामुळे नागरिकांना निराश परत जावे लागते. मनपा प्रशासनाने अनेकदा शासनाकडे वाढीव प्रमाणात लस द्यावी, अशी मागणी केली होती. परंतु याचा उपयोग झाला नाही. आता पहिल्या डोस काही काळ बंद ठेऊन दुसरा डोस सुरु ठेवण्याचा विचार मनपा करत आहे. लवकरच याबाबत घोषणा करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी नमूद केले आहे.