परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
महिलांनी मनात आणले तर त्या गाव कारभार अत्यंत शिस्तीने कशा पध्दतीने करू शकतात याचे ताजे उदाहरण कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन चालू असलेल्या लॉक डाऊन मध्ये पाथरी तालूक्यातील वडी गावात पहायला मिळत आहे. गावाचा कायदा व सुव्यवस्था सांभाळणारे पोलीस पाटील, कोतवाल, ही पदे मागील अनेक वर्षापासून रिक्त असल्याने ही जबाबदारी गावच्या महिला सरपंच चंदाताई कुटे यांच्यावर आली असुन सध्या महिलांची टिम गावांमध्ये कायदा सुव्यवस्था व आरोग्याची जनजागृती करून गावांमध्ये वेगळ्या पद्धतीने आपल्या कामाचा ठसा निर्माण करत गाव दक्ष करण्याचं काम या महिलांनी केले आहे. यातून अँन्टी कोरोना वॉरीअर्स म्हणून त्या काम करत असल्याच ही दिसून येत आहे. पाथरी तालूक्यातील उपक्रमशील गाव म्हणुन वडी गाव प्रसिद्ध आहे. या गावचे गावकरी प्रत्येक सार्वजनिक प्रश्न एकोप्याने गावात सोडवण्याचा प्रयत्न करतात. मग तो निसर्गनिर्मित दुष्काळावर मात करण्यासाठी का असेना, निसर्ग जोपासना, पाणी अडवणे, गाव स्वच्छता असो कि शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम सर्वच बाबतीत हे गाव अग्रेसर आहे.
सध्या कोरोणा संसर्गामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून देशभर लॉक डाऊन लागू करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आपलं गाव सुरक्षित राहावं इथला गावकरी सुरक्षित राहावा म्हणून सर्व गावकरी नियमांचे पालन करत आहेत. यामध्ये गावातील महिलांनी पुढाकार घेतला असून त्या दक्ष राहत, आरोग्यसंदर्भातील या संकटकाळी गावाची काळजी घेत आहेत. याचाच भाग म्हणुन गावात नवीन आलेल्या नातेवाईकांची चौकशी करून गावात त्यांना प्रवेश दिला जात आहे. जिल्हा बाहेरील आलेल्या व्यक्ती ना गावातील सर्वना होम क्वारंटाइन करण्यात येत आहे. त्यामूळे गावात कोणी येत नाही व गावातील नागरीक देखील गावा बाहेर जात नाही. ऊस तोड कामगार व मजूर गावात आल्यानंतर त्यांना होम क्वारंटाइन करण्यात येत आहे. याबाबत गावात जनजागृती करून ‘व्हिलेज टास्क फोर्सची ‘ भूमिका तेवढ्याच पोटतिडकीनं त्या गावांमध्ये मांडत आहेत.
त्यामुळे गावातील सार्वजनिक ठिकाणी गावातील नागरिक देखील बसत नाही, माझ गांव माझं योगदान उपक्रमाचे युवक जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक हे देखील गावामध्ये येऊन लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम करत आहेत. त्यामुळे दिलेल्या सूचनांचे नागरिक तेवढ्याच तत्परतेने अंमलबजावणी करत आहेत. जे नागरिक होम क्वारंटाइन करण्यात आलेली आहेत त्या नागरिकांना जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी या सर्व महिलांनी गावात मदत फेरी काढत, जमा झालेल्या धान्यातून होम क्वारंटाइन केलेल्या नागरिकांना जेवणाची व्यवस्था गावातील शाळेत केली आहे.या ठिकाणी पिण्याचे पाणी, शौचालयाची व्यवस्था तसेच लाईट आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ज्या नागरिकांना होम क्वारंटाइन करण्यात आलेले आहे त्या नागरिकांनीदेखील १४ दिवस त्या कार्यक्षेत्राच्या बाहेर आलेले नाहीत व गावातील इतर नागरिक देखील त्यांच्या संपर्कात येऊ दिलेले नाही. गावाच्या प्रवेशाच्या दारावर चौकशी नाका उभारला असून येणाऱ्या अनोळखी व्यक्तींची सखोल चौकशी केल्यानंतरच गावात प्रवेश दिला जात आहे. गावात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चांगल्या पद्धतीने गाव हाताळण्याचे काम गावच्या सरपंच चंदाताई कुटे यांच्या नेतृत्वाखाली गावांमध्ये होतांना दिसत आहे. त्यांना या कामामध्ये त्याचे पती तथा साद ग्रामचे अध्यक्ष शिवाजी कुटे हे मदत करत असल्याचे त्या अभिमानाने सांगतात.