Vande Bharat Sadharan Train | वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही आता प्रवाशांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेसच्या सेवेत आणखीन वाढ करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. सध्या देशभरात २५ हून अधिक मार्गांवर वंदे भारतची रेल्वे सेवा सुरू आहे. मात्र वंदे भारत मधून प्रवास महाग असल्याने अनेक प्रवाशांना इच्छा असूनही प्रवास करता येत नाही. यासाठी भारतीय रेल्वेने (Indian Railway) एक मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाकडून वंदे साधारण ट्रेनची निर्मिती करण्यात आली आहे. या साधारण ट्रेनची पहिली झलक नुकतीच समोर आली आहे. गरीब आणि सर्वसामान्य जनतेसाठी आणलेल्या या साधारण ट्रेनचे दर कमी आणि सुविधा जास्त असतील असे म्हटले जात आहे.
तिकिट कमी सुविधा जास्त
समोर आलेल्या माहितीनुसार, सध्या वंदे भारत साधारण ट्रेन साठी डबे बनवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या ट्रेनचे डबे चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) येथे तयार केले जात आहेत. पुढील काही महिन्यातच हे डबे पूर्णपणे तयार होतील. या डब्यांमध्ये सर्वसामान्य प्रवाशांना खूप सुविधा पुरवल्या जाणार आहेत. मुख्य म्हणजे, साधारण ट्रेनचे तिकीट पुरवल्या जाणाऱ्या सेवेंपेक्षा कमी असणार आहे. ज्यामुळे सर्वसाधारण नागरिक सहजरीत्या वंदे भारत साधारण ट्रेनने प्रवास करू शकतील.
🚨 Vande Sadharan trains, an non AC economical version of Vande Bharat is getting ready. (📸- @trains_of_india) pic.twitter.com/2NMpxeSdeg
— Indian Tech & Infra (@IndianTechGuide) September 11, 2023
वंदे साधारण ट्रेनमध्ये कोणत्या सुविधा असतील? Vande Bharat Sadharan Train
सर्वसामान्य प्रवाशांसाठी बनवण्यात येणाऱ्या वंदे भारत साधारण ट्रेनमध्ये 24 कोच असतील. यासोबतच बायो व्हॅक्यूम टॉयलेट्स, पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम, चार्जिंग पॉईंट अशा सुविधा देखील प्रवाशांसाठी पुरवल्या जातील. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. इतकेच नव्हे तर, ट्रेनमध्ये ऑटोमॅटिक डोअर सिस्टिमची सुविधाही उपलब्ध असेल. या ट्रेनचा वेग हा एक्सप्रेसपेक्षा जास्त असणार आहे. यामुळे काही अवघ्या तासातच प्रवासी आपल्या ठिकाणावर पोहोचू शकतील.
वंदे साधारण ट्रेनचे तिकीट दर
वंदे भारत साधारण ट्रेन ही शताब्दी आणि जनशताब्दीसारखी असेल. रेल्वे प्रशासनाने वंदे साधारण ट्रेन सर्वसामान्य प्रवाशांसाठी तयार केली आहे. त्यामुळे या ट्रेनचे दर देखील प्रवाशांना परवडेल असेच ठेवण्यात आले आहेत. परंतु अद्याप याचे निश्चित दर रेल्वे विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत. या ट्रेनमध्ये प्रवाशांना सर्व सोयी सुविधा पुरवल्या जातील. त्यामुळे या सोयीसुविधांना धरून तिकिटाचे दर निश्चित केले जातील.