हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनने (Vande Bharat Express Train) प्रवास करणे दिवसेंदिवस लोकांना आवडू लागले आहे. त्यामुळेच आता वंदे भारत ट्रेनची लोकप्रियता देशभरात वाढत चालली आहे. खास म्हणजे कोकणात जाण्यासाठी प्रवासी वंदे भारत ट्रेनचाच पर्याय निवडत आहेत. वंदे भारत ट्रेनने कोकणात जाताना निसर्ग सौंदर्याचे दर्शन घडते. तसेच, वंदे भारतने प्रवास अधिक जलद आणि आरामदायी होतो. परंतु आता कोकण रेल्वे मार्गावर धावणारी हीच वंदे भारत बंद होणार असल्याची चर्चा रंगली आहे.
कमी वेळामध्ये आरामदायी प्रवास करण्यासाठी वंदे भारत ट्रेन एक उत्तम पर्याय ठरत आहे. परंतु, ही वंदे भारत ट्रेन कोकण रेल्वे मार्गावर धावणार नसल्याचे सांगितले जात आहे. वंदे भारत ट्रेनसह तेजस एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार असल्याचेही संकेत दिले जात आहेत. हे संकेत थेट IRCTC च्या संकेतस्थळावरून देण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवासी चिंतेत पडले आहेत. तसेच खरंच वंदे भारत ट्रेन आणि तेजस एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहे? असा सवालही विचारला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 10 जूनपासून कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत आणि तेजस एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार असल्याचा मेसेज IRCTC च्या संकेतस्थळावर दाखवला जात आहे. त्यामुळे कोकण मार्गावर धावणाऱ्या या महत्त्वाच्या रेल्वे बंद होणार असल्याच्या चर्चेचा वेग वाढला आहे. दरम्यान, दरवर्षी रेल्वेकडून पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात येते. हे वेळापत्रक 10 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीत लागू असते. परंतु अजूनही असे कोणतेही वेळापत्रक रेल्वेकडून जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रवाशांना जेवून ते ऑक्टोंबर दरम्यानची तिकिटे बुक करण्यास अडचण येत आहे.
तर दुसऱ्या बाजूला, वंदे भारत एक्सप्रेस आणि तेजस एक्स्प्रेस रद्द होणार असल्याच्या चर्चेवर उत्तर देण्याचे काम रेल्वे विभागाने केले आहे. यात, अजूनही पावसाळी वेळापत्रक न मिळाल्यामुळे पुढील दिवसातील बदल नमूद करण्यात आले नसल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे. मात्र वंदे भारत एक्सप्रेस आणि तेजस एक्स्प्रेस रद्द झाली आहे की नाही याबाबात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.