औंधला शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम; रंगरंगोटी स्वच्छतेची कामे सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या ग्रामनिवासिनी व मूळपीठ निवासिनी श्रीयमाईदेवी व राजवाडयातील कराडदेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास सोमवार दि.26 पासून प्रारंभ होत आहे. 26 सप्टेंबर ते गुरूवार दि.6 आँक्टोंबर अखेर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे अशी माहिती श्री यमाईदेवी देवस्थानच्या मुख्य विश्वस्त श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी दिली.

सोमवारी सकाळी श्री कराडदेवीची यमाईदेवी मंदिरात मकरात स्थापना केली जाणार आहे. यावेळी पुण्यहवाचन, महाआरती, मंत्रपुष्पांजली आदी कार्यक्रम श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी व राजघराण्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहेत. मंत्र व पौरोहित्य पठन गणेशशास्त्री इंगळे व वसंतराव देशपांडे करणार आहेत. त्यानंतर सोमवार दि.26 ते रविवार दि. 2आँक्टोंबर या दरम्यान नियमित सकाळी व संध्याकाळी महानैवेद्य, महाआरती, मंत्रपुष्पांजली तसेच रात्री 9 वाजता नियमित ह.भ.प. गजाननबुवा कुरोलीकर यांचे कीर्तन होणार आहे.

मंगळवारी देवीचे पाट्यापूजन, देवीची ओटीपूजन, मूळपीठ देवीच्या ओटी भरणाचा कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर सोमवार दि.3 रोजी मूळपीठ डोंगरावर देवीच्या अष्टमी उत्सवानिमित्त हरिजागराचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी देवीची पालखीतून मिरवणूक काढली जाणार आहे. याशिवाय पूजा आरती, महानैवेद्य, महाआरती, मंत्रपुष्पांजली कुष्मांडपूजा, प्रसाद वाटप आदी कार्यक्रम होणार आहेत. मंगळवार दि.४ रोजी देवीउत्थापना, घट उत्थापना,कुमार कुमारी पूजन कार्यक्रम होणार आहे.

बुधवार दि.5 रोजी राजवाडयात शस्त्रपूजा, सायंकाळी श्रींची पालखीतून सिमोल्लंघन मिरवणूक काढली जाणार आहे. यावेळी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर वेशीवर आपटा पूजन करून डबे लावून गोळीबार केला जाणार आहे. रात्री कराडदेवीच्या दरबार हाँल मध्ये सोने देण्याचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी गवई गाणे, अत्तर गुलाब पाणी,पानसुपारी देण्याचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.गुरुवार दि.6रोजी लळीताने नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे. दोन वर्षानंतर नवरात्रोत्सव होत असल्याने सर्वत्र स्वच्छता ,रंगरंगोटी, मूळपीठ डोंगर, ग्रामनिवासिनी श्री यमाईदेवी देवी मंदिरात विद्युत रोषणाईचे काम सुरू आहे.