थर्ड अँगल : मल्हार इंदूरकर
२०२१ चा महापूर आल्यानंतर वाशिष्ठी नदी मध्ये गाळ खोरून काढण्याचा कार्यक्रम एकमार्गी नगर पालिकेकडून सुरू झाला. मुळात हे काम कोणताही अभ्यास न करता व्यावसायिक दृष्टी असलेल्या काही उत्स्फूर्त मागणीतून सुरू झाले. अभ्यास हा मुळात अभ्यासक वर्गाकडून झाला पाहिजे. महाराष्ट्रातील प्रमुख नदी विषयावरचे अभ्यासक (hydrologist) व पर्यावरण तज्ज्ञ, वाशिष्ठी नदी वरती चालत असलेल्या उरफटी कामाच्या विरोधात बोलत असताना दिसत आहेत. ह्या मध्ये महाराष्ट्रातील ज्येष्ठ नदी अभ्यासक परिणीता दांडेकर ह्यांचा ही समावेश होतो. सामान्य जनता ह्या भाबड्या आशेत आहे की गाळ काढल्यावर पूर थांबेल.
राजकीय स्तरावर नदीला मुळात कालव्याच्या रुपात बघितले जात आहे. कालवा, ज्याचे दोन्ही काठ समांतर असतात, दोन्ही काठ भिंतीचे असतात, तळ समांतर असते, कुठेही खोलगट डोह नाहीत की उथळ तळ नाही, किनाऱ्यावर झाडे झुडपे नाहीत. एका पाईप मधून पाणी बिन रोख वाहते त्या प्रमाणे कालवा असतो.
ह्या उलट नदीला डोह असतो, जे उन्हाळ्यासाठी पाण्याचे संग्रह करून ठेवतात, उथळ दगडांचे तळ असते ज्या वरून पाणी खळाळत वाहते आणि पाण्यामध्ये ऑक्सिजन तयार होतो, किनाऱ्यावरील सोळ, शेरणी, लव्हाळी सारखी गवत- झुडुपे असतात जिथे अनेक छोटे पक्षी, प्राणी आसरा घेतात, नदीमध्ये अनेक छोटी मोठी बेट असतात जे पुराच्या पाण्याचा अमाप लोट शिथिल करत असतात. आता हे सगळे तोडून मोडून नदीला एका सरळसोट पाईप रुपी कालव्या मध्ये बंदिस्त करून नेण्याचा घाट घातला जात आहे.
मुळात प्रश्न हा आहे की एवढे सगळे करून पूर येणे थांबणार आहे का? नदी ही मुळात खूप क्लिष्ट व्यवस्था आहे. नदीच्या पुराची तीव्रता कमी करण्याच्या सगळ्या नैसर्गिक व्यवस्था आपण उध्वस्त करत आहोत. पाण्याच्या जबरदस्त झोताची तीव्रता कमी करणारे वळणे, बेट, झुडुपे, झाडे हे सगळे आपण उध्वस्त करत चाललो आहोत. त्या ठिकाणी ह्याला पर्यायी व्यवस्था काय व ती किती काम करेल ह्याबद्दल काहीच शाश्वती नाही.
नदी खोल झाल्याने पाणी पातळी कमी राहील हा गोड गैरसमज किती तग धरून राहील, काही खात्री नाही, कारण नदी खोल केली म्हणून समुद्राची पाणी पातळी खाली उतरत नाही, ती तेवढीच राहते. ह्या उलट समुद्राचे खारट पाणी आत येण्याचा मार्ग मोकळा होतोय. उदाहरण घ्यायचे झाले तर तेरेखोल नदी काठी वसलेले बांदा – शेरले गाव. समुद्र पासून अंतर मोजायचे झाले तर बांदा चे तेरेखोल खाडी वाटे अंतर हे चिपळूण चे दाभोळ खाडी वाटे समुद्र पासून अंतरा पेक्षा लांब. पण गोव्यातील फुग्णाऱ्या शहरांसाठी वाळू उपशामुळे बांदा गावात समुद्र सारखे खारट पाणी येते. दर वर्षी ह्या ग्रामपंचायतीला आता बांध घालून नदीचे पाणी अडवून गोडे पाणी साठवावे लागते. वाशिष्ठी नदीचा तळ उपसला तर कदाचित भविष्यात चिपळूण ला खाऱ्या पाण्याचा पुरवठा होऊ शकतो. त्यात पुराचा प्रश्न हा अजूनच भीषण होण्याची शक्यता आहे.
२०२१ ची भीषण परिस्थिती ही अश्याच कारणाने पुढे आली. नदीच्या शहरापासून वरच्या भागात (upstream) कराड राज्य मार्ग बांधण्यासाठी नदीच्या तळाला खोरुन रस्त्यावर भराव टाकला गेला, परिणामी खेर्डी बाजारपेठ भागात पाण्याचा जबरदस्त लोट आला व वाटेत येणाऱ्या सर्व गोष्टी पाण्याने वाहून नेल्या. हे कमी की काय, आता संपूर्ण नदी ही खोरुन काढण्याचे काम चालू आहे. बर एका फोटो मध्ये बेट दिसत आहे, तर एका फोटो मध्ये बेट काढले आहे.
मल्हार इंदूरकर, चिपळून
(लेखक हे पर्यावरणप्रेमी आहेत)