नागपूर । “बच्चू कडू (Bachchu Kadu) बाईकवर दिल्लीला गेले आणि शेतकरी आंदोलनात सहभागी झाले. मंत्रिमंडळातील मंत्र्यांना आंदोलन करण्याचा अधिकार नाही. एकतर मंत्री राहा नाही तर आंदोलन करा. मी मुख्यमंत्री असतो तर राजीनामा मागितला असता”, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मांडली. नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकार आणि भाजपवर सडकून टीका केली.
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर (Farmers Protest) गेल्या 26 दिवसांपासून पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात आता देशभरातील शेतकरी सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला राज्य सरकारने पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर राज्यमंत्री बच्चू कडू स्वत: बाईकवर दिल्लीला गेले आणि शेतकरी आंदोलनात सहभागी झाले. मात्र, यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे.
“महाराष्ट्र् सरकारने दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. मात्र तो फक्त तोंड देखला आहे. पंजाब सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकार देखील का कायदा करत नाही? अधिवेशनाचे दोन दिवस कांजूरमार्ग आणि कंगनावर गेले. शेतकऱ्यांना वेळच नाही. अधिवेशन नाही तर आम्ही काय करायचं? अस सांगितलं जातं. दोन दिवसांच्या अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी कायदा तयार केला नाही”, अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.“भाजप घटनाबाह्य वागत आहे, असा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून करण्यात येत आहे. मात्र, हे तीन पक्षदेखील घटनाबाह्य वागत आहेत”, अशी टीका त्यांनी केली.
“आरएसएस, भाजप यांची मांडणी पूर्णपणे हुकमशाह पद्धतीची आहे. हे दिल्लीच्या आंदोलनावरून दिसून येते. शेतकरी थंडीत बसले आहेत. मात्र सरकार निर्णय घेत नाही. आम्ही कायदा केला तुम्ही मान्य करा, अशी भूमिका आहे. शेतकऱ्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि पाठिंबा देतो. हे तीन कायदे आल्यानंतर सरकारी खरेदी संपली असेल”, असं आंबेडकर म्हणाले “सरकार खरेदी करणार नाही मग फूड सिक्युरिटीचं काय होणार? फूड सिक्युरिटी द्यायची नाही अशी सरकारची भूमिका दिसते. शासन खरेदी करणार नसेल तर नागरिकांना सबसिडीचं अन्नधान्य मिळणार नाही. त्यामुळे त्यांनी जगायचं कसं? हा प्रश्न निर्माण होणार आहे”, असं मत त्यांनी मांडलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’