औरंगाबाद | औरंगाबाद शहरातून दुचाकी चोरी करून ती जालना जिल्ह्यात विकणारा अट्टल दुचाकी चोराच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या असून आरोपीने शहरातून तब्बल 30 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. आकाश भगवान तांबे वय-26 (रा.मिसरवाडी) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी आकाश हा सिडको भागातील एम. जी. एम. कॅम्पस मधून मोठ्या शिताफीने दुचाकी वाहन चोरी करायचा आणि चोरी केलेली दुचाकी जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागात विकायचा अनेक महिन्यापासून अशा चोऱ्या तो करीत होता. आकाशबाबत खबऱ्यांकडून गुन्हेशाखेच्या पथकाला टीप मिळल्यानंतर पथकाने त्यावर पाळत ठेवत त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने त्याला पोलिसी खाक्या दाखवताच आकाशने तोंड उघडले.
त्याच्या ताब्यातून सहा चोरीच्या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तर अशे तब्बल 30 गुन्हे शहरात केल्याची कबुली आरोपी आकाश ने पोलिसांना दिली आहे. पुढील तपासासाठी आरोपीला सिडको पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या आरोपिकडून बरेच गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.




