सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
पाटण तालुक्यातील मळे, कोळणे, पातरपुंज या डोंगरी भागातील नागरिकांना दळणवळण करण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघातील नागरिकांनाच रस्ता तयार करण्याचे काम हाती घ्यावे लागत आहे ही दुर्दैवी गोष्ट आहे.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे याकडे कायमच दुर्लक्ष असल्याच म्हणत नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पाटण भागात सध्या पाऊस थांबला असून ये-जा करण्यासाठी वाहनांना कसरत करावी लागत आहे. येथील गावांना जाण्यासाठी जंगलातून जावे लागत असून हा रस्ता बांधण्याचा प्रश्न सध्या वादग्रस्त आहे. जुलै महिन्यात पडलेल्या पहिल्याच पावसाळ्यात येथील रस्ता वाहून गेला होता.
पावसाळ्यात यमळे, कोळणे, पातरपुंज या डोंगरी भागातील गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता असल्याने नागरीकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.. या संदर्भातील निवेदन वारंवार देऊन सुध्दा लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जातं असल्याचा आरोप केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आता खुद्द नागरिकांनीच रस्ता तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.