बॉलिवूडनगरी | चित्रपट परीक्षण
भीती – मानवी आयुष्यातील एक अविभाज्य घटक. आनंदाला समाधानाची किनार असते तर दुःखाला भीतीची. अनेकदा मानवी सुख-दुःखाच्या इमोशन्सव्यतिरिक्तही भीतीचे प्रकार असू शकतात. त्याविषयी कार्यक्रमांच्या मालिका निघतात आणि लोकांनाही त्या आवडीने पाहू वाटतात. हाच विषय घेऊन चित्रपट निघाले नसते तर नवल. आज असाच एक भयपट बॉलिवूड इंडस्ट्रीने आपल्या दर्शकांसमोर आणला – भूत. हा चित्रपट दोन भागांत प्रेक्षकांना पहायला मिळणार असून २१ तारखेला आलेलं भूत लोकांच्या मनात भीती तयार करु शकलेलं नाही.
विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला भूत प्रेक्षकांना घाबरवण्यात किंवा भीती दाखवण्यात म्हणा अपयशी ठरला आहे. कोणत्याही गोष्टीची सहज भीती वाटणाऱ्या लोकांसाठी हा भयपट असू शकेल पण सराईत भयपट बघणाऱ्यांची मात्र या चित्रपटाने निराशा केली आहे.
चित्रपटाची कथा जहाज आणि त्यात असलेली भीतीदायक भुतं अशी रचण्यात आली असून विकी कौशल (सुमित देसाई) हा ते जहाज हटवण्यासाठी नेमण्यात आलेला शिपिंग ऑफिसर दाखवण्यात आला आहे. २०११ साली मुंबईतील जुहू बंदरात असलेल्या एका निर्मनुष्य जहाजाची पार्श्वभूमी या चित्रपटाला असल्याचं लक्षात येत आहे. सुमित हा आपल्या पत्नी (भूमी पेडणेकर) आणि मुलीच्या मृत्यूमुळे मानसिक तणावातून जात असतो. याचवेळी त्याच्याकडे जहाजाचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी येते. आपल्या पत्नी व मुलीच्या मृत्यूला सुमित (विकी कौशल) स्वतःलाच जबाबदार धरत असतो आणि त्याला काम करतानाही या गोष्टींचा कायम भास होतो. हा गुंता सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सुमितला यश मिळतं का हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपट पहावा लागेल.
चित्रपटाचा पूर्वार्ध हा भयपट दाखवण्याच्या हेतूने योग्य पद्धतीने आहे. मात्र उत्तरार्धात फॅमिली ड्रामा, इमोशन्स या गोष्टींचा कारण नसताना आधार घेण्यात आला आहे. चांगल्या भयपटात कॉमेडी दाखवण्याचा नसता खटाटोप का केलाय हे समजत नाही. भूमी पेडणेकर या चित्रपटात नसती तरी चाललं असतं हे तिला मिळालेल्या क्षुल्लक भूमिकेवरून म्हणण्याची वेळ येते. चित्रपटाची कथा आणखी मजबूत करता आली असती असं राहून राहून वाटतंच. अभिनयाचा विचार करता विकी कौशल आणि आशुतोष राणा यांनी भयपटाला साजेशी अशी भूमिका केली आहे. मात्र ती आणखी चांगली करता आली असती हेही तितकंच खरं.
चित्रपटाच्या तांत्रिक बाबींचा विचार करता त्यात चित्रपट सरस ठरतो. चित्रपटात वापरण्यात आलेलं बॅकग्राउंड म्युझिक अफलातून आहे. कला दिग्दर्शन आणि सिनेमॅटोग्राफी उत्तम झाली आहे. वापरण्यात आलेले लोकेशन्स भीतीदायक असले तर त्यात जिवंतपणा आणण्यात कथा आणि कलाकार कमी पडलेले आहेत.
चित्रपटाला हॅलो महाराष्ट्रकडून – ५ पैकी २.५ गुण
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.