सांगली : हॅलो महाराष्ट्र – अनेकदा आपण शेतीच्या बांधावरून भावा भावांमध्ये भांडणे झालेली पाहिली आहेत. याच वादातून कधी कधी हाणामारी होते. असाच एक वाद सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील राजेवाडी शिवारात पाहायला मिळाला आहे. शेतीच्या बांधावरून झालेल्या वादावरुन दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. हि संपूर्ण घटना एका मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात याबाबत सहा जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बांधाच्या वादावरुन दोघांना बेदम मारहाण, सहा जणांविरोधात गुन्हा दाखल pic.twitter.com/cUEt1vTquy
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) March 9, 2022
नेमका प्रकार काय?
राजेवाडी शिवारात धोंडीराम शिरकांडे यांची 40 एकर जमीन आहे. त्यांच्या जमिनीच्या बाजूला संदीप शिरकांडे यांची जमीन आहे. या दोघांमध्ये शेतीच्या बांधावरुन अनेक वर्षापासून वाद सुरु होता. या प्रकरणी 2001 मध्ये न्यायालयात दावासुद्धा दाखल करण्यात आला होता. 4 मार्च रोजी स्वप्नील शिरकांडे आणि मच्छिंद्र शिरकांडे हे जमिनीचा बांध फोडत असताना धोंडीराम शिरकांडे आणि बाळासाहेब शिरकांडे त्यांना समजावून सांगत होते. मात्र बांधाच्या वादावरुन सहा जणांनी धोंडीराम शिरकांडे आणि बाळासाहेब शिरकांडे यांना बेदम मारहाण केली आहे.
या मारहाणीचा व्हिडीओ धोंडीराम यांच्या मुलाने कॅमेरात कैद केला आहे. या मारहाणीप्रकरणी आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्नील शिरकांडे, मचिंद्र शिरकांडे, बाबुराव जगताप, महादेव जगताप, प्रशांत जगताप, दादासाहेब जगताप अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. आटपाडी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.