हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण महाराष्ट्रात बारामती लोकसभा मतदारसंघ (Baramati Lok Sabha) चर्चेत आहे. अजित पवारांनी सवतासुभा मांडल्यानंतर बारामतीत यंदा शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवारांकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यात मुख्य लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा बारामतीत राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मात्र आता नणंद- भावजयच्या लढाईत तिसऱ्याच उमेदवारांची एंट्री झाली आहे. या उमेदवाराने दोन्ही पवारांना पाडा असं आवाहन मतदारांना केलं आहे. आम्ही तुम्हला ज्या नेत्याबद्दल सांगत आहोत त्यांचं नाव आहे विजय शिवतारे….
विजय शिवतारे (Vijay Shivtare) हे पवार कुटुंबियांचे कट्टर विरोधक मानले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी ओपन चॅलेंज देऊन शिवतारेंच पुरंदरमध्ये पानिपत केलं होते. त्यामुळे सध्या महायुतीत एकत्र असले तरी शिवतारे विरुद्ध अजित पवार यांच्यातील वाद काही मिटेना.. त्यातच आता रविवारी एका कार्यक्रमात बोलताना शिवतारे यांनी पवार कुटुंबियांवर तोफ डागली. बारामती म्हणजे काय पवार कुटुंबीयांचा सातबारा नाही असं म्हणत बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांच्या विरोधात तब्बल 5 लाख 80 हजार मतदार असलयाचा दावा सुद्धा विजय शिवतारे यांनी केला.
येणाऱ्या लोकसभेत आपण आरपारची लढाई लढणार आहे असं म्हणत शिवतारे यांनी बारामतीतून लोकसभेसाठी उभं राहणार असल्याची घोषणा केली. माझं चिन्ह कोणतं असेल, हे अद्याप अस्पष्ट आहे, पण मी आगामी लोकसभा लढवण्यावर ठाम असल्याचं शिवतारे यांनी म्हटलं आहे. शिवतारे जर निवडणुकीला उभे राहिले तर नेमका कोणत्या पवारांना फायदा होईल? कि दोन्ही पवारांना नुकसान होईल ते येणारी वेळच सांगेल.. परंतु बारामतीच्या लढाईला दोघीत तिसरा आता सगळं विसरा असं म्हणायची वेळ आली आहे हे मात्र नक्की….