सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके
ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. यावरून आज सातारा पोलीसांनी बंडातात्या कराडकर यांच्या फलटण तालुक्यातील पिंपरजमधील मठात जाऊन त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान बंडातात्या कराडकर यांच्या आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी व्यसनमुक्त युवक संघाचे विलासबाबा जवळ यांनी माफी मागितली आहे.
बंडातात्या कराडकर यांनी राजकीय नेत्यांबद्दल साताऱ्यात आंदोलना दरम्यान आक्षेपार्ह वक्तव्य केले होत. यानंतर त्यांच्यासह 125 जणांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला. दरम्यान विलासबाबा जवळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, काल सातारा येथे करण्यात आलेल्या आंदोलना दरम्यान ह.भ.प बंडातात्या कराडकर यांनी जी वक्तव्ये केली. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहे. सर्वांनी हा विषय येथेच थांबवावा आणि वाईन विरोधी धोरणाबद्दल बोलावे आणि हा निर्णय रद्द करण्यासाठी प्रयत्न कराव, अशी विनंती विलासबाबा जवळ यांनी केली आहे.
सातारा येथे काल बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी राज्य महिला आयोगाच्यावतीने सातारा पोलिसांकडे चौकशीची मागणी करण्यात आली. त्यानंतर आज सकाळी सातारा पोलिस बंडातात्या कराडकरांच्या फलटण तालुक्यातील पिंप्रद येथील राष्ट्र संत गुरुवर्य दिक्षित मठात दाखल झाले. दोन तासानंतर पोलिसांनी बंडातात्या कराडकर यांना ताब्यात घेतले असून त्यांना सातारा शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे.