हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी सहकार मंत्री आणि तब्बल 35 वर्ष कराड दक्षिण मतदार संघाचे आमदार राहिलेले काँग्रेसचे जेष्ठ नेते विलासराव पाटील उंडाळकर यांचे आज निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. सातारा येथील हॉस्पिटलमध्ये त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.
विलासराव उंडाळकर नेहमी पुरोगामी विचारांसाठी ओळखले जायचे. त्यांनी सलग 35 वर्ष कराड दक्षिण मतदार संघाचे प्रतिनिधित्व केलं. 2004 च्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होता.सहकार मंत्री म्हणून त्यांनी दमदार काम केलं होतं.
1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कापणीनंतर ही सातारा जिल्ह्यात कराड दक्षिण विधानसभा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून विलासराव पाटील-उंडाळकर यांनी अबाधित ठेवला होता. 2014 साली विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विलासराव पाटील-उंडाळकर यांचा पराभव केला होता. त्यावेळी अपक्ष निवडणूक लढवणार या विलासराव पाटील-उंडाळकर यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या विचारधारेपासून फारकत न घेता आपली तत्वे विचार आणि निष्ठा कायम ठेवले होती.
तीन महिन्यापूर्वी जिल्ह्यात पुन्हा राष्ट्रीय काँग्रेस बळकट करण्यासाठी सर्व मतभेदांना तिलांजली देत विलासराव पाटील उंडाळकर आणि माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण हे जिल्ह्यातील दोन्ही नेते एकत्र आले होते. ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे कार्यकर्ते एकदिलाने निवडणूक लढवत असतानाच विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या निधनाने राष्ट्रीय काँग्रेसला जबर धक्का बसला आहे. दरम्यान काकांच्या जाण्याने कराड दक्षिण मतदारसंघाने एक हक्काचा माणूस गमावला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’