हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुरूवारी शिरसुफळ तालुक्यातील सांगवीत डिजिटल बॅनर फाडल्यामुळे दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 200 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दोन गटात झालेल्या हाणामारीत 3 पोलीस अधिकारी आणि 15 कर्मचारी जखमी झाले आहेत. इतकेच नव्हे तर, या जमावाकडून गाड्यांवर देखील दगडफेक करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत शिरसुफळमध्ये या दंगलीचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. आता या संपूर्ण घटनेची पोलीस चौकशी करीत आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, गुरुवारी आदिवासी दिना दिवशी सांगवी गावात बॅनर लावण्यात आले होते. मात्र एका गटाकडून हे बॅनर फाडण्यात आले. त्यामुळे दुसऱ्या गटाने संतप्त होऊन आक्रमकाची भूमिका घेतली. तसेच यानंतर बाचाबाची पासून सुरू झालेला वाद हाणामारी पर्यंत येऊन पोहोचला. या हाणामारीत अनेक जणांना गंभीर दुखापत आणि आर्थिक नुकसान झाले. अखेर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन सर्व परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच, सकाळी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
सांगवी पोलिसांनी या प्रकरणात 13 जणांना अटक केली असून 200 पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक संजय बारकुंड डीवायएसपी सचिन हिरे, पोलीस निरीक्षक ए. एस. आगरकर, गावात ठाण मांडून बसले आहेत. तसेच सांगवी गावात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त लावण्यात आला आहे. रात्रीच्या सुमारास हाणामारीनंतर जमावातील तरुणांनी संशयितांवर कारवाई करावी या मागणीसाठी मुंबई आग्रा महामार्गावर आडवे पडून रास्ता रोखून ठेवला होता. यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. यानंतर पोलिसांकडून दोन्ही गटातील तरुणांची समजूत काढण्यात आली.
दरम्यान, या दोन गटातील वादशांत करण्यासाठी घटनास्थळी आमदार काशीराम पावरा, तहसीलदार महेंद्र माळी पोहचले असता त्यांच्या वाहनांवर देखील जमावाने दगडफेक केली. यामुळे वातावरण आणखीन चिघळले गेले. शेवटी, पोलिसांनी या प्रकरणात कठोर कारवाई करत 13 जणांना अटक केली. डिजिटल बॅनर फाडल्यामुळे जो वाद निर्माण झाला त्यामुळे आता सांगवी गावात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. गावात एसआरपीएफचे जवान तैनात करण्यात आहेत.