कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
बेलवडे बुद्रुक (ता. कराड) गावच्या हद्दीत शेतजमिनीच्या वादातून दोन कुटुंबात चाकू, दांडके, दगड व लाथाबुक्क्यांनी तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. याबाबत तालुका पोलिसात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून दोन्हीकडील 13 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वसंत तुकाराम दगडे, शालन वसंत दगडे, भरत वसंत दगडे (सर्व रा. दगडेमळा, कासेगाव, जि. सांगली) व अंजना (पूर्ण नाव माहित नाही) (रा. रेठरे बुद्रुक, ता. कराड), शंकर बापू माने, श्रीधर यसंकर माने, पराग शिवाजी माने, तुषार हैबता माने, हैबती बापू माने व इतर 3 ते 4 अनोळखी नावे समजू शकली नाहीत अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विश्वजीत शंकर माने यांने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, विश्वजीतचे वडील व चुलते यांचे नावावर कासारशिरंबे गावचे हद्दीत जमिन आहे. त्याचे शेजारी वसंत दगडे यांची जमिन आहे. फिर्यादी माने व दगडे यांच्या येण्याजाणेच्या वाटेवारून 14 वर्षापासून वाद आहे. त्या कारणावरून आठवड्यापूर्वी माने व दगडे यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी विश्वजीतच्या वडीलांना मारहाण झाली होती. गुरूवार (दि. 15) एप्रिलला विश्वजीत व त्याचा चुलत भाऊ तुषार हायपती माने व पराग शिवाजी माने हे शेतातील विहीर व शेत बघायला गेले होते. त्यानंतर ते घरी जात असताना वसंत दगडे व त्यांची पत्नी शालन हे त्यांचे शेतातील शेडजवळ उभे होते. त्यावेळी शालन दगडे ह्या विश्वजीतला पाहून कशाला आमच्याकडे डोळे काढून बघताय असे म्हणून वसंत दगडे याने शिवीगाळ केली. त्यावेळी विश्वजीतने तुम्ही आम्हाला विनाकारण शिवीगाळ करताय असे म्हणाला असता. भरत दडगे हा त्याच्या शेडमधून तलवार घेऊन शिवीगाळ करत बाहेर येऊन जाता का येथून नाहीतर एकाएकाला या तलवारीने तोडीन, अशी धमकी देऊन विश्वजीतच्या अंगावर जावू लागला. त्यावेळी विश्वजीत ये असे म्हणाला त्यावेळी शालन हिने विश्वजीतला हातातील कळकाच्या दांडक्याने तोंडावर मारले. यामध्ये तो जखमी झाला. त्यावेळी तुषार माने हा मध्ये आला असता त्यावेळी वसंत दगडे याने त्याचे हातातील काठीने तुषार याला मारहाण केली. त्यावेळी सुरू असलेली भांडणे पाहून अंजना ही हातात दगड घेऊन तुषार याचे अंगावर जात असताना, विश्वजीत मध्ये गेला असता तिने मारलेला दगडे विश्वजीतला लागला. अधिक तपास सहाय्यक फौजदार तांदळे करीत आहेत.
तर याउलट वसंत तुकाराम दगडे यानी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, बेलवडे बुद्रुक गावचे हद्दीत वसंत दगडे यांची शेत जमिन असून त्याशेजारी शंकर बापू माने यांची शेतजमिन आहे. सदर शेत जमिनीमध्ये जाणेचे रस्त्यावरून शंकर माने व वसंत दगडे यांच्यावत वाद आहे. यापूर्वीही दोन्ही कुटुंबात वाद झाला होता. गुरूवारी दुपारी 12.30 वाजणेच्या सुमारास वसंत दगडे शेतात पत्नी व मुलगी तिघेजण वाडे गोळा करत असताना त्यावेळी शंकर माने, श्रीधर माने, पराग माने, तुषार माने, हैबती माने व इतर 3 ते 4 जणांनी दगडे यांच्या शेडवर येऊन शेतातील रस्त्याचे वादाचे कारणावरून श्रीधर माने, तुषार माने यानी त्यांचे हातातील चाकू, दांडक्याने वसंत दगडे यांच्या हाताचे बोटावर, पाठीवर, डावे पायावर मारून तसेच पराग माने याने त्याचे हातातील चाकूने वसंत दगडे पायावर मारून जखमी केले. तसेच शालन दगडे हिचे नाकावर पराग माने याने मारून जखम केली. व इतर लोकांनी हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. तसेच मुलगी अंजना हिस तुषार, हैबती, श्रीधर यांनी हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अधिक तपास पोलीस हवालदार राजे करीत आहेत.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा