हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) आता टीम इंडियाचा कोच झाला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याबाबत घोषणा केली. त्यामुळे राहुल द्रविड (Rahul Dravid) नंतर आता गौतम गंभीर भारतीय संघाला कोचिंग करणार आहे. मात्र एका रिपोर्टनुसार, गौतम गंभीरची नियुक्ती बाबत बीसीसीआयने विराट कोहलीशी (Virat Kohli) कोणतीही चर्चा केली नसल्याचे समोर आलं आहे. फक्त कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार हार्दिक पंड्या यांनाच गंभीरच्या नियुक्तीबाबत माहिती होती. त्यामुळे चर्चाना उधाण आलं आहे.
हिंदुस्तान टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, बीसीसीआयने गंभीरला मुख्य प्रशिक्षक बनवण्याचा निर्णय घेतला तेव्हा फक्त रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्यालाच लूपमध्ये ठेवण्यात आले होते. या काळात विराट कोहलीशी कोणतीही चर्चा झाली नाही किंवा त्याला याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. खरंतर विराट कोहली आणि गंभीर यांच्या नात्यात अनेकदा तणाव निर्माण झाला आहे. अनेकदा मैदानावर दोघांमध्ये खटके उडल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र आयपीएल 2024 दरम्यान त्यांच्या नात्यातील दुरावा दूर झाला होता. तरीही गंभीरच्या नियुक्तीबाबत बीसीसीआयने कोहलीला अंधारात का ठेवलं हे कळायला काय मार्ग नाही.
रिपोर्टनुसार, विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अशा स्थितीत भविष्याचा विचार करून बीसीसीआयने कोहलीचा सल्ला न घेता गंभीरची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. रिपोर्टमध्ये पुढे सांगण्यात आले की, रोहित शर्माचे वय लक्षात घेऊन हार्दिक पांड्याला लूपमध्ये ठेवण्यात आले होते. कारण रोहित शर्मानंतर हार्दिक पंड्या टीम इंडियाचा पुढचा कर्णधार असू शकतो. रोहित शर्मा उपलब्ध नसताना त्याने 2022 आणि 2023 मध्ये भारतीय संघाचं टी-20 मध्ये नेतृत्व केलं आहे. मात्र जायबंदी झाल्याने तो टी-20 मधून बाहेर पडला. रोहित शर्मा कर्णधार म्हणून परतल्यानंतर हार्दिकने टी-20 मध्ये उपकर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडली. टी-20 वर्ल्ड कपमध्येही तो उपकर्णधार होता.