विराट कोहलीच्या जीवाला धोका; RCB ने रद्द केली पत्रकार परिषद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेटविश्वातून एक खळबळजनक माहिती समोर येत आहे. रॉयल चॅलेंन्जर बंगळुरूचा स्टार खेळाडू विराट कोहलीला (Virat Kohli) भर आयपीएलच्या माहौलात धमकी देण्यात आली आहे. कोहलीच्या जीवाला धोका असून त्यामुळे आरसीबीच्या संघाने सराव सत्रात सहभागही घेतला नाही आणि सामन्यापूर्वीची पत्रकार परिषद सुद्धा रद्द करण्यात आली आहे. दहशतवादी कारवायांच्या संशयावरून गुजरात पोलिसांनी सोमवारी रात्री अहमदाबाद विमानतळावरून चार जणांना अटक केली. पोलिसांनी चार आरोपींच्या झाडाझडती घेतल्यानंतर शस्त्रे, संशयास्पद व्हिडिओ आणि मजकूर संदेश जप्त केल्याची माहिती आहे. यानंतरच कोहलीच्या जीवाला धोका असल्याचे समोर आलं.

याबाबत आनंदबाजार पत्रिकेच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा झाला आहे. रिपोर्टनुसार, विराट कोहलीला धमक्या (Virat Kohli Threat) मिळाल्या होत्या त्यामुळे आरसीबीने (Royal Challenger Bangalore) सराव सामना आणि पत्रकार परिषद रद्द केली. या धमकीनंतर आरसीबीच्या टीम हॉटेलबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. सर्व RCB संघातील खेळाडूंसाठी वेगळी एंट्री देण्यात आली. जी हॉटेलमधील इतर कोणत्याही व्यक्तीला नसेल. एवढच नव्हे तर मान्यताप्राप्त मीडिया कर्मचाऱ्यांनाही हॉटेलच्या आवारात प्रवेश दिला जात नव्हता. विराट कोहली हा एक राष्ट्रीय खजिना असून त्याची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे अशी माहिती पोलीस अधिकारी विजय सिंघा ज्वाला यांनी दिली.

दरम्यान, आज रात्री ७या वाजून ३० मिनिटांची रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स (RR Vs RCB Eliminator Match) यांच्या एलिमिनेटर सामना पार पडणार आहे. विराट कोहलीच्या तुफान फॉर्मच्या जोरावर आरसीबीने चमत्कार करत प्ले ऑफ मध्ये धडक मारली. आज त्यांचा सामना संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्स विरोधात असून आज जो संघ सामना हरेल तो आयपीएल मधून बाहेर जाईल आणि जो जिंकेल त्याला क्वालिफायर २ मध्ये सनरायजर्स हैद्राबादशी दोन हात करावे लागतील.