हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टी-20 विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. आत्तापर्यंत खेळलेल्या तिन्ही सामन्यात भारताने विजय मिळवत ग्रुप मध्ये आघाडी घेतली आहे. यामध्ये अंतिम षटकात पाकिस्तानचा केलेल्या पराभवाचा सुद्धा समावेश आहे. मात्र ३ विजय मिळवून सुद्धा टीम इंडियासाठी टेन्शन सारख्या अनेक गोष्टी आहेत. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे विराट कोहलीचा (Virat Kohli) खराब फॉर्म…. आत्तापर्यंत भारतीय संघ या स्पर्धेत अजिंक्य राहिल्याने कोहलीचा सुमार फॉर्म झाकला गेला आहे, मात्र सुपर ८ मध्ये मात्र याची मोठी किंमत भारतीय संघाला मोजावी लागू शकते.
वर्ल्डकप पूर्वी पार पडलेल्या आयपीएल मध्ये विराट कोहलीने सलामीला येऊन खोऱ्याने धावा काढल्या होत्या. ज्या स्ट्राईक रेटवरून त्याला डिवचण्यात आलं तो सुद्धा त्याने सुधारल्याने विश्वचषक स्पर्धेत कोहलीकडून मोठी अपेक्षा होती. विराट कोहली सुद्धा प्रथमच वर्ल्डकप मध्ये सलामीला येत आहे. मात्र पहिल्या तिन्ही सामन्यात त्याने चाहत्यांचा अपेक्षाभंग केला आहे. आयर्लंडविरुद्ध विराट कोहली 5 चेंडूत 1 धावा काढून बाद झाला. यानंतर पाकिस्तानविरुद्ध 3 चेंडूत 4 धावा आणि अमेरिकेविरुद्ध तर शून्यावरच कोहली बाद झाला. म्हणजेच आतापर्यंत विराट कोहलीला T20 विश्वचषकातील 3 सामन्यांत केवळ 5 धावा करता आल्या आहेत. कोहलीच्या या सुमार फॉर्ममुळे (Virat Kohli Poor Form)टीम इंडियाचे टेन्शन वाढलं आहे.
विराट कोहलीचा फॉर्म असाच खराब राहिला तर त्याची संघातील जागाही धोक्यात येऊ शकते. टीम इंडियाकडे यशस्वी जैस्वालच्या रूपाने आक्रमक सलामीवीर आहे जो कोणत्याही मैदानावर डाव पलटवण्याची क्षमता राखतो. मात्र कोहली सलामीला येत असल्याने यशस्वीला संधी मिळाली नाही. भारतीय संघ ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना कॅनडाविरुद्ध खेळणार आहे. १५ जूनला होणाऱ्या या सामन्यात सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर असणार आहेत. कोहलीने कॅनडाविरुद्ध चांगल्या धावा केल्या तर भारतासाठी ही दिलासायक बाब ठरेल, अन्यथा कोहलीचे संघातील स्थान धोक्यात येण्याची शक्यता आहे.