‘गाबा दा ढाबा’ !! सेहवागकडून शार्दुल-सुंदरचं हटके स्टाईल कौतुक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या अखेरच्या कसोटीतील पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने केलेल्या ३६९ धावांच्या आव्हानाला उत्तर देताना भारताच्या आघाडीच्या फलंदाजांची तारांबळ उडाली असताना वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूर यांनी झुंजार फलंदाजी करत ऑस्ट्रेलिया ला जेरीस आणलं. त्यात शार्दुल ठाकूरने सर्वाधिक ६७ धावांची खेळी केली. कसोटी कारकिर्दीतील त्याचे हे पहिले अर्धशतक ठरले. ११५ चेंडूत त्याने ९ चौकार आणि २ षटकार लगावत अर्धशतक केले. तसेच सुंदरनेदेखील १४४ चेंडूत ६२ धावा केल्या.

भारताचा धडाकेबाज माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने आपल्या हटके अंदाजात या दोघांचं कौतुक केलं. ब्रिस्बेनच्या गाबा मैदानात सुरू असलेल्या सामन्याबाबत त्याने ट्विट केले, “गाबा दा ढाबा. शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यासाठी आजची फलंदाजी म्हणजे ढाब्यावर जाऊन छान जेवणावर ताव मारण्यासारखं होतं. दोघांनी अप्रतिम खेळ करून दाखवला.

या दोघांच्या प्रयत्नांमुळेच ऑस्ट्रेलियाला केवळ ३३ धावांची आघाडी घेता आली. एकेकाळी ती आघाडी १३३ धावांची होते की काय असं वाटत होतं. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा एकत्रित मिळून हजारांहून जास्त सामन्यांचा अनुभव आहे. त्यांच्याविरूद्ध असा खेळ करणं खूपच मोठी गोष्ट आहे”, असं सेहवाग म्हणाला.

Leave a Comment