सातारा प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील
ब्रिटीशकाळापासून लष्कराचा इतिहास सांगणारे धगधगत्या इतिहासाची साक्ष देणारे सातारा जिल्ह्यातील विसापूर हे गाव आहे. खटाव तालुक्यातील या गावात 225 आजी- माजी सैनिक आहेत. आजपर्यंत भारत देशासाठी या गावातील 5 सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. सातारा जिल्ह्यातील मिलिटरी अपशिंगे या गावासोबत आता विसापूर या गावातही घरटी सैनिकांची परंपरा निर्माण होवू लागली आहे. इतिहासाची साक्ष देणाऱ्या विसापूर गावाला लष्करी सेवेचा एक धगधगता इतिहास आहे.
खटाव तालुका हा पूर्वी दुष्काळी भाग म्हणून सर्वपरिचित होता. आता अनेक ठिकाणी शेतीच्या पाण्याची सोय झाल्याने पिके उभी दिसतात. परंतु पूर्वीपासूनच धगधगता इतिहास या गावाला लाभला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे ब्रिटीशच्या काळातही विसापूर गावातील नामदेव बळवंत साळुंखे हे ब्रिटीश सैनिकाच्यात जवान म्हणून कार्यरत होते. नामदेव साळुंखे यांनी दुसऱ्या महायुद्धात सहभाग घेतल्याचेही या गावातील माजी सैनिक सांगतात. या ब्रिटीश सैनिकांच्या पत्नी हिराबाई साळुंखे (वय- 95) या आजही हयात (जिवंत) आहेत.
विसापूरला स्वातंत्र्य सैनिकांचाही वारसा लाभलेला आहे. सन 1947- 48 या दरम्यान गणपत जिजाबा सावंत यांनाही वीरमरण आले होते. तर भारत- पाकिस्तानच्या सन 1971- 72 च्या युध्दात सोपानराव साळुंखे शहिद झाले. सन 1986 साली सुभेदार श्रीरंग तात्याबा सावंत यांना राजस्थान (कोटा) येथे महापुरात बोट पलटी झाल्याने वीरमरण आहे. सुभेदार श्रीरंग सावंत यांच्या शाैर्याची दखल घेवून त्यांना मरणोत्तर शाैर्यपदक बहाल करण्यात आले आहे. सन 31 डिसेंबर 2017 साली विश्वनाथ हिंदुराव साळुंखे हे वेस्ट बंगाल येथे ड्युटीवर असताना अपघातात मृत्यू पावले. तर लडाख येथे सुभेदार विजय शिंदे यांना 27 मे 2022 रोजी वीरमरण आले.
मला गर्व आहे, मी विसापूरचा असल्याचा
आमच्या प्रत्येक घरोघरी एक फाैजी आहेत. या गावाचे एक वैशिष्ट आहे. गावतच प्रशिक्षण देवून जवान तयार केले जाते. माझा जन्म विसापूर गावात झाला, मला गर्व आहे असल्याचे लष्करात हवालदार पदावर कार्यरत असलेले विजय साळुंखे यांनी सांगितले.