सांगली लोकसभेवरून वाद सुरु असतानाच विशाल पाटलांचे लेटरबॉम्ब!! स्पष्ट केली भूमिका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगली लोकसभा मतदारसंघावरून (Sangli Lok Sabha 2024) महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी सांगलीसाठी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. सांगलीमध्ये काँग्रेसची ताकद असून विशाल पाटील (Vishal Patil) यांनाच महविकास आघाडीकडून तिकीट देण्यात यावं अशी मागणी काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आली आहे. पलूस कडेगावचे आमदार विश्वजित कदम यांनी तर थेट वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. त्यातच आता काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी थेट आपल्या कार्यकर्त्यांना पत्र (Vishal Patil Letter) लिहीत सांगलीची जागा काँग्रेसचं लढवणार आहे असं आश्वासन दिले आहे.

विशाल पाटील यांचं पत्र जसंच्या तसं

मागच्या काही वर्षात सांगली काँग्रेसचा अनेक आघाड्यांवर संघर्ष सुरू आहे. सांगलीकरांच्या विकासासाठी आपण सत्ताधाऱ्यांविरुद्ध सातत्याने संघर्ष करत आहेत. काँग्रेसनेच जिल्ह्यात विकासरुपी गंगेच्या माध्यमातून सांगलीचा चेहरामोहरा बदलून टाकला. त्यामुळे सांगली काँग्रेसची आणि काँग्रेस सांगलीची असं समीकरणच तयार झालं आहे.

स्वर्गीय वसंतदादा पाटील, स्व. पतंगराव कदम साहेब, स्व. गुलाबराव पाटील साहेब, स्व. प्रकाशबापू पाटील, स्व. मदनभाऊ पाटील, स्व. आर आर पाटील, शिवाजीराव देशमुख अशा अनेक दिग्गज नेत्यांनी सांगलीच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली हे तुम्हाला ठावूकच आहे. त्यामुळे काँग्रेस आणि सांगलीचं अतुट नात तयार झालं आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सांगलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपणही सर्वजण लढण्यासाठी सज्ज झालो आहोत. मला काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतोय. शिवाय सर्व नेते आणि कार्यकर्ते एकजुटीने सांगली काँग्रेसचीच या भूमिकेवर ठाम आहेत. आपल्या सर्वांच्या वतीने मा. विश्वजित कदम साहेब सर्व प्रयत्न करत आहेत.

या आधीच्या काळात तुम्ही सर्व जण पक्षाच्या आणि माझ्या पाठीमागे खंबीरपणे आहात याबद्दल मी तुम्हा सर्वांचा अत्यंत आभारी आहे तुमची खंबीर साथ अशीच सोबत राहो. आपणा सर्वांना विश्वास आहे कि, सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार आहे. तुम्ही सर्वांनी सांगलीच्या प्रगतीसाठी आतापर्यंत दाखवलेला संयम असाच आणखी काही दिवस ठेवा. सांगली लोकसभेच्या उमेदवारीबाबत नक्कीच चांगली बातमी येईल याची मला खात्री आहे. आपल्याला काँग्रेसचा हा गड मोठ्या ताकदीने केवळ लढवायचा नाही, तर जिंकायचा आहे. आपण लढू आणि जिंकू….

आपलाच,

विशाल प्रकाशबापू पाटील