कोकणातील हा किल्ला जिंकण्यास संभाजी महाराजांना आले अपयश; पुढे मराठ्यांनी केले राज्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महाराष्ट्रामध्ये गडकिल्ल्यांची संपत्ती आहे. या गडकिल्ल्यांमुळेच संपूर्ण जगभरात महाराष्ट्राची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक गडकिल्ले जिंकले. या गडकिल्ल्यांवरूनच स्वराज्याचा कारभार चालवला. पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा छत्रपती संभाजी महाराज यांनी चालवला. परंतु, संभाजी महाराज यांना अलिबागमध्ये असलेला कोर्लई नावाचा (Kolai Fort) किल्ला जिंकता आला नाही. त्यांच्यानंतर हा किल्ला मराठ्यांनी जिंकला. ही बाब फार कमी लोकांना माहिती असावी. त्यामुळे आज आपण याच किल्ल्याविषयी जाणून घेणार आहोत.

कोर्लई किल्ल्याची माहिती

कोकणातील समुद्र किनारपट्टीला लागून असलेला कोर्लई किल्ला पोर्तुगिजांनी बांधला होता. हा किल्ला निजामशाही आणि पोर्तुगीज साम्राज्याचा साक्षीदार ठरतो. कोर्लई किल्ल्यावरूनच पोर्तुगीज आणि निजाम यांच्यामध्ये भले मोठे युद्ध झाले होते. खरे तर निजामांनी पोर्तुगीजांची स्थिती सळो की पळो अशी करून ठेवली होती. परंतु हार मानतील ते पोर्तुगीज कसले. पोर्तुगीजांनी निजामांचा खात्मा करण्यासाठी 400 सैन्यांची फौज उभी केली होती. या चारशे सैन्यांनी बाराशे निजाम सैन्यांची हत्या केली. 1740 पर्यंत हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यातच होता. पुढे संभाजी महाराज यांनी या किल्ल्याला जिंकण्याचा प्रयत्न केला. परंतु यामध्ये संभाजी महाराजांना यश आले नाही. त्यानंतर वसईच्या मोहिमेत मराठ्यांनी कोर्लई किल्ला जिंकला.

कोर्लई किल्ल्यावर कसे जायचे?

अलिबाग समुद्रकिनारापासूनच 23 किलोमीटरवर कोर्लई किल्ला वसलेला आहे. अलिबाग शहरापासून रिक्षा, ऑटो किंवा कार करून या किल्ल्यापर्यंत पोहोचता येते. या किल्ल्याच्या पायथ्याशी कोर्लई गाव आहे. या गावाच्या नावावरूनच किल्ल्याला देखील कोर्लई नाव देण्यात आले आहे. या किल्ल्यावर कोर्लई गावातून जाता येते. कोर्लई किल्ला हा जलदुर्ग आहे. त्यामुळे या किल्ल्याच्या भोवती भक्कम तटबंदी पाहायला मिळते. किल्ल्यावर गेल्यानंतर आपल्याला दूरपर्यंत नेत्र सुख देणारा समुद्र पाहायला मिळतो. या किल्ल्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यावर एक गोड्या पाण्याची विहीर देखील आहे. ही विहीर निजामाने बांधली असावी असे सांगितले जाते. तसेच या किल्ल्यावर पोर्तुगीज भाषेत लिहिलेले शिलालेख आहे. त्यामुळे पोर्तुगीज आणि निजामांचा इतिहास जाणून घेण्यासाठी या किल्ल्याला एकदा तरी भेट द्यावी.