हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बंड ही सांगलीची परंपरा आहे. सांगलीच्या रक्तातच बंड आहे. आणि ते यशस्वी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, सांगलीच्या जागेवरून लोकसभेसाठीचा (Sangli Lok Sabha Election 2024) अर्ज दाखल केल्यानंतर विशाल पाटलांनी (Vishal Patil) दिलेली ही गॅरंटी. यंदाच्या निवडणुकीत सांगलीचा तिढा अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण ठरतोय. महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या फॉर्मुल्यात काँग्रेसची हक्काची जागा असणाऱ्या सांगलीचा बळी देण्यात आला. कित्येक दशकांचं काँग्रेसनं विणलेलं कार्यकर्त्यांपासून ते पदाधिकाऱ्यांच्या इच्छेला नख लावायचा प्रयत्न झाला. वसंतदादाच्या नातूला साईडलाईन करत शिवसेनेनं चंद्रहार पाटलांना मैदानात उतरवलं. वरिष्ठांनी समजूत काढली की विशाल पाटलांचं बंड थंड होईल, असा सगळ्यांचाच अंदाज होता. पण विशाल पाटलांनी हा अंदाज चुकवला. आपल्याला वसंतदादांचा नातू का म्हणतात? हे दाखवून देत ते जिंकून येण्याच्या समीकरणापर्यंत जाऊन पोहोचलेत. उद्धव ठाकरेंबद्दल जनतेच्या मनात सॉफ्ट कॉर्नर असतानाही सांगलीची जनता ‘नो मशाल ओन्ली विशाल’ या नाऱ्यावर का ठाम आहे? विशाल पाटलांची आम्ही समजूत काढू असं वारंवार म्हणूनही काँग्रेसच्या नेत्यांना यश का येत नाहीये? विशाल पाटलांच्या ताकतीचा अंदाज लावायला काँग्रेस चुकली का? याच सगळ्या प्रश्नांचा आढावा घेऊयात
सांगली ही आमची नैसर्गिक जागा आहे. ती आम्हाला मिळायलाच हवी होती. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये राग असणं स्वाभाविक आहे, असं म्हणत बाळासाहेब थोरातांनी आपल्या मनातील खदखद थोडीफार बोलून दाखवली असली तरी, या सगळ्या प्रतिक्रिया पाहिल्यावर एक गोष्ट कन्फर्म दिसते ती म्हणजे सांगलीच्या जागेवर काँग्रेस केव्हाची बॅकफुटला फेकली गेली आहे. सांगलीची ही जागा मिळवण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी कडवा विरोध केला नाही, ना आजही ते करतायत. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली घेतली तर यात चुकलं काय? असा पॉलिटिकल करेक्ट प्रश्न विचारत शिवसेना सेफ गेम खेळतीये. मात्र या सगळ्यात दादा पाटील घराण्याच्या निवडून येण्याचे चान्सेस असलेल्या नातूला डावलून काँग्रेसने नेमकं काय सिद्ध केलं?
काँग्रेसच्या सेंट्रल इलेक्शन कमिटीनं म्हणजेच केंद्रीय निवडणूक समितीने निवडणुकीआधी ज्या काही उमेदवारांच्या नावावर मोहोर ठेवली होती, त्यात विशाल पाटलांच्या नावाचा समावेश होता. थोडक्यात काय तर विशाल पाटील सहजपणे निवडून येतील, अशी ग्राउंड रियालिटी होती. विश्वजीत कदमांसोबतचे त्यांचे सूरही जुळले होते. त्यामुळे काँग्रेसला महाराष्ट्रात ज्या कुठल्या जागेवर निवडून येण्याचा ठाम विश्वास असेल, तर ती सांगलीचीच जागा होती. मात्र जागा वाटपाचा फॉर्मुला ठरवताना काँग्रेसनं अमरावती, रामटेक यांसारख्या जागांचा हट्ट धरून सांगली हातची घालवली. याला शिवसेनेला जबाबदार धरण्यापेक्षा सर्वतोपरी काँग्रेसलाच जबाबदार धरायला हवं. पक्षाच्या पदरात जास्तीत जास्त जागा पाडून घेण्याचं राजकारण करून उद्धव ठाकरे काही चूक करत नाहीत. उलट कोल्हापूर आणि इतर काही जागांवर आपला वचक असतानाही त्या जागा त्यांनी काँग्रेसला सोडून आधीच मनाचा मोठेपणा दाखवला होता. मात्र सांगलीच्या तिढ्यावर काँग्रेस नेते अक्षरशः मूग गिळून गप्प बसले होते. याचाच अर्थ पक्षांतर्गत राजकारणातूनच विशाल पाटलांच्या उमेदवारीचा बळी देण्यात आला की काय? अशाही चर्चा लोकांमध्ये होऊ लागल्या आहेत.
विश्वजीत कदमांनी फुल टू प्रयत्न करूनही विशाल पाटलांच्या उमेदवारीचं काही एक झालं नाही. दादा पाटील घराण्याला दिलेल्या या ट्रीटमेंटला आता जशास तसं उत्तर देण्यासाठी विशाल पाटलांनी शेवटी बंडाचा शब्द दिला. काँग्रेस पक्षाकडून तर दुसरा अपक्ष म्हणून निवडणूक अर्ज दाखल करून विशाल पाटलांनी आपण निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचं सांगितलं. त्यामुळे विशाल पाटील एकाच वेळेस भाजपचे स्टॅंडिंग खासदार संजय काका पाटील, शिवसेनेचे चंद्रहार पाटील आणि काँग्रेस या तिघांनाही इंगा दाखवत खासदार होऊ शकतात. याची काही कारण आहेत.
त्यातलं पहिलं म्हणजे विशाल पाटलांनी पेटवलेलं भावनिकतेचं राजकारण
लोकसभा निवडणुकीच्या धामधूमीच्या आधीपासूनच सांगलीचा उमेदवार आपणच असल्याचं त्यांनी अनेकदा सार्वजनिक व्यासपीठांवरून बोलून दाखवलं होतं. सांगलीच्या गावागावात काँग्रेसची ताकद असताना आपण हे ही समजून घ्यायला हवं. की त्यांची निष्ठा जितकी पक्षाच्या बाजूने असते तितकीच ती दादा पाटील घराण्याच्या बाजूने देखील. मुळात जिल्ह्यात काँग्रेसचा विस्तार झाला तो याच दादा पाटील घराण्यामुळे. त्यामुळे जेव्हा विशाल पाटील यांची उमेदवारी मागे पडली. तेव्हा या काँग्रेस कार्यकर्त्यांना भावना अनावर झाल्या. प्रसंगी काँग्रेसचा बिल्ला खाली ठेवू पण मत विशाल पाटलांनाच देऊ, अशी भूमिका त्यांनी घेतलीये. आपल्यावर सांगलीत अन्याय झाला असं वारंवार विशाल पाटील बोलून दाखवतायत. त्यांची उमेदवारी नाकारण्यामागे काँग्रेसलाही व्यावहारिक असं उत्तर देता येत नाहीये. त्यामुळे काँग्रेसचा विचार मानणारा प्रत्येक मतदार, कार्यकर्ता आणि पदाधिकारी हा विशाल पाटलांच्याच बाजूने झुकलेला दिसतोय. त्यामुळे नाराज झालेला हा काँग्रेसी मतदार हा महाविकास आघाडीच्या मुळावर उठू शकतो. विशाल पाटील वरचढ ठरतात ते यामुळेच.
दुसरी गोष्ट म्हणजे आंबेडकरांची मिळालेली साथ
2019 च्या निवडणुकीला वंचित फॅक्टर अनेक जागांवर महत्त्वाचा ठरला. त्याला सांगलीही अपवाद नव्हता. वंचितच्या तिकिटावर सांगलीतून गोपीचंद पडळकर मैदानात उतरले होते. विशाल पाटलांना निवडून येण्याच्या लीडिंग मार्जिन साठी जेवढ्या मतांची गरज हवी होती त्याहून अधिक जागा पडळकरांनी आपल्या पदरात पाडून घेतली होती. म्हणजेच 2019 लाच विशाल पाटलांचा खासदारकीचा चान्स हुकला. त्यामुळे यंदा वंचित कुणाला ताकद पुरवणार? या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं असताना प्रकाश आंबेडकरांनी आपला पाठिंबा विशाल पाटलांना जाहीर केला. त्यामुळे दादा पाटील घराण्याला वंचितच्या रूपाने बहुजन, मुस्लिम आणि अल्पसंख्यांक समाजाची ताकद मिळणार असल्याने विशाल पाटील अपक्ष म्हणूनही मैदान मारू शकतील…
तिसरी गोष्ट म्हणजे भाजप विरोधातील अँटीइन्कमबन्सी
गेल्या दोन टर्म खासदार राहिलेल्या भाजपच्या संजय काका पाटलांना जर टफ फाईट कुणी देऊ शकेल तर ते फक्त विशाल पाटीलच, असं परसेप्शन मतदार संघात आधीच सेट झालंय. मागच्या निवडणुकीत विशाल पाटलांनी दिलेली टक्कर पाहता काही टेक्निकल बाबी टाळता आल्या असत्या तर संजय काका पाटलांचं पानिपत फिक्स होतं. 2019 ला जे झालं त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठीच विशाल पाटलांनी वर्षभरापासून फिल्डिंग लावत संजय काका पाटलांना शिंगावर घ्यायला सुरुवात केली होती. संजय काकांचा राजकीय विरोधक म्हणून विशाल पाटलांकडे पाहिलं जात होत. पण फासे उलटे पडत त्यांचे विरोधात महाविकास आघाडीने मशालीच्या चिन्हावर चंद्रहार पाटलांना उमेदवारी देऊ केली. राजकारणाच्या आखाड्यात हा फारसा सांगलीकरांना माहीत नसणाऱ्या या नव्या नवख्या चेहऱ्यावर मविआने विश्वास टाकला. शिवसेनेची ग्राउंडवर ताकद नसताना केवळ महाविकास आघाडीच्या जोरावर आपण मैदान मारू, असं स्वप्न पाहणाऱ्या शिवसेनेसाठी मात्र हे दिवा स्वप्नच राहू शकतं. काँग्रेसची पुरती ताकद मिळाली नाही तर हा गड चंद्रहार पाटलांना अवघड दिसतोय. त्यात स्वतः विशाल पाटीलच निवडणुकीच्या मैदानात असतील. तर सगळं मतदान हे विशाल पाटलांकडे सरकू शकतं…
विशाल पाटील अपक्ष मैदानात उतरतायत म्हणजे त्यांच्याकडे जिंकून येण्याचा काँन्फिडन्स आहे. वंचितची ताकद प्लस, पाटलांचे कार्यकर्ते प्लस, विश्वजित कदमांची रसद असा आकडा जुळवून पाहिला तर विशाल पाटील यांच्यासाठी निवडणूक प्लसमध्येच दिसते. अनेक माजी आमदार आणि स्थानिक नेतेही विशाल पाटलांना आपला पाठिंबा जाहीर करतायेत. सांगली घेण्याचा हट्ट करणाऱ्या उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासाठी म्हणूनच विशाल पाटील हे सध्या काळ बनून उभे आहेत. दुसरीकडे नाना पटोले यांनी सांगलीची जागा मिळण्यासाठी दाखवलेल्या निष्क्रीयतेचा अर्थ म्हणजे राज्यातील काँग्रेसच्या काही नेत्यांना विशाल पाटलांच्या नावाला विरोध असल्याचं दिसतंय. त्यामुळे सांगलीचं मैदान मारत विशाल पाटील एकाच वेळेला अनेक जणांनी केलेल्या अपमानांचा वचपा काढणार असल्याचं दिसतंय…