हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्राम्हण समाजात संभाजी- शिवाजी अशी नावे नसतात. सरस्वती- शारदा देवींनी किती शाळा काढल्या? तसेच तसेच ब्राह्मणांच्या ताब्यात शिक्षण व्यवस्था असताना महिलांना शिकण्यास बंदी होती असं वादग्रस्त विधान केल्यानंतर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या विरोधात राज्यातील ब्राह्मण समाज आक्रमक झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे (Vishwajeet Deshpande) यांनी भुजबळांवर हल्लाबोल करत त्यांच्या कानाखाली मारणाऱ्याला १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलं आहे.
छगन भुजबळ यांचे वक्तव्य हिंदू विरोधी असून हिंदू जातींमध्ये तेढ निर्माण करणारे आहे. त्यांचं विधान देवी सरस्वतीचा अपमान करणारे आहे, भुजबळांनी कोणाची पूजा करावी हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. परंतु ब्राह्मण समाजावर वारंवार अशाप्रकारची नीच प्रकारची विधाने करणे हे अत्यंत निषेधार्य आहे. त्यामुळे आता त्यांना माफी नाही. त्यामुळे जो तरुण छगन भुजबळ यांच्या कानाखाली मारेल, त्याला परशुराम सेवा संघ एक लाख रुपयांचे बक्षीस देईल अशी जाहीर घोषणाच विश्वजित देशपांडे यांनी केली.
छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले होते?
कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जन्मदिनानिमित्त मविप्र संस्थेतर्फे समाज दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी वादग्रस्त विधाने करत सरस्वती किंवा शारदा देवींनी किती शाळा काढल्या? त्यांनी किती लोकांना शिक्षण दिले? असा सवाल उपस्थित केला. त्याचबरोबर, “सामान्यांना शिक्षणाचा अधिकार महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराजांनी मिळवून दिला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचा कायदा करून साऱ्यांनाच शिक्षणाचे कवाडे उघडी केली. त्यामुळे तेच माझे देवत आहेत” असे भुजबळ यांनी म्हणले.. येव्हडच नव्हे तर भुजबळांनी ब्राह्मणी व्यवस्थेवर देखील भाष्य केले. “दोनशे वर्षापुर्वी दिड टक्के ब्राह्मणांच्या ताब्यात शिक्षण व्यवस्था होती. महिलांना देखील शिकण्यास बंदी होती. अन्य समाज सारा अशिक्षीत. त्यामुळे त्यांचे हक्क काय, अधिकार काय कोणालाच ठावूक नव्हते असं भुजबळ म्हणाले होते.