सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
प्राज्ञपाठशाळामंडळाने तयार केलेले ग्रंथ व खंड हे राष्ट्रासाठी दिशादर्शक असून प्राज्ञपाठशाळेच्या विकासासाठी शासनाकडून निधी दिला जाईल, अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री .सामंत यांनी वाई येथील प्राज्ञपाठशाळामंडळाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी आमदार कपिल पाटील, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष राजा दिक्षीत, प्राज्ञपाठशाळामंडळाचे सचिव अनिल जोशी, भालचंद्र मोने, डॉ. निरज हातेकर आदी उपस्थित होते. भारतीय संस्कृती अभ्यासण्यासाठीचे प्राज्ञपाठशाळामंडळ हे केंद्र आहे. हे मंडळ वास्तवाला धरुन काम करीत आहे. प्राज्ञपाठशाळामंडळाच्या विकासासाठी लवकरच मुंबईत बैठक घेतली जाईल. प्राज्ञपाठशाळामंडळाने मोठ्या ग्रंथांची व खंडांची निर्मिती केली आहे. यापुढेही निर्मितीसाठी शासनाकडून मदत दिली जाईल. प्राज्ञपाठशाळामंडळ भारतीय संस्कृतीचे संशोधन केंद्र व्हावे यासाठी मुलभूत सुविधांसाठी निधी दिला जाईल. प्राज्ञपाठशाळामंडळ हे देशाला दिशा देणारे आहे. प्राज्ञपाठशाळामंडळासाठी शासनाकडून जे-जे करावे लागेल ते केले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आमदार कपिल पाटील म्हणाले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राज्ञपाठशाळामंडळाला मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी प्रतिसाद दिला होता. प्राज्ञपाठशाळामंडळ हे भारतीय संस्कृतिचे संशोधन केंद्र आहे. या प्राज्ञपाठशाळामंडळाच्या पाठीशी यापुढे शासन ठामपणे उभे राहील, असे त्यांनी सांगितले.