सोलापूर प्रतिनिधी | आज गणेश चतुर्थी निमित्ताने येथील सावळया विठुरायाला दुर्मिळ कन्हेरी फुलांची आरास करण्यात आली आहे. कन्हेरी फुलांच्या माळा तयार करून विठ्ठल रूक्मिणीचा गाभारा सजवण्यात आला आहे.
मंदिरातील सजावटीसाठी खासकरून कर्नाटकातील बंगळुरू येथून 100 किलो गुलाबी रंगाची कन्हेरी फुले मागवण्यात आली आहेत. गुलाबी रंगाच्या कन्हेरी फुलांनी देवाचा गाभारा उजळून निघाला आहे. कन्हेरीची फुलं ही गणपतीला प्रिय असतात. विठुरायाचे आजचे गोजिरे रूप पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली आहे. आज सकाळी विठ्ठल मंदिरात मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते गणेश मूर्तीचीही प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली.
गणेश चतुर्थीचे औचित्य साधून मंदिर समितीच्या वतीने कन्हेरी फुलांची सजावट करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.