टीम, HELLO महाराष्ट्र । दूरसंचार क्षेत्रामध्ये रिलायन्स जिओ ने आगमन केल्यानंतर मोठी क्रांती घडली. कमी पैशांमध्ये जास्त डाटा आणि सुविधा देत त्यांनी मोठ्या प्रमाणात ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यात यश मिळवले. त्यामुळे बाकीच्या अग्रगण्य दूरसंचार कंपन्यांचे चांगलेच धाबे दणाणले. त्यांनी देखील जिओप्रमाणे कमी पैश्यांमध्ये जास्त सेवा देत स्पर्धेमध्ये टिकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यामध्ये मोठा तोटा देखील झाल्याचे समोर आले. याचा परिणाम इतका झाला कि काही अग्रगण्य कंपन्यांना इतर कंपन्यांसोबत विलीनीकरण करावे लागले तर काहींना कंपनी बंद करावी लागली. मात्र आता दूरसंचार क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्या असलेल्या एअरटेल , व्होडाफोन -आयडिया यांनी आपला तोटा भरून काढण्यासाठी प्रीपेड प्लॅन्स चे दर वाढवण्याचा निर्णय घेतला. याची अंमलबजावणी त्यांनी आज पासून चालू केली आहे.
दरम्यान एअरटेल आणि व्होडाफोनने १६९ रुपये आणि १९९ रुपयांचे प्लॅन बंद केले आहेत. बंद करण्यात आलेले हे दोन्ही प्लॅन्स युजर्समध्ये सर्वाधिक लोकप्रिय प्लॅन्सपैकी एक होते. २८ दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅन्समध्ये दरदिवशी अनुक्रमे एक जीबी आणि १.५ जीबी डेटा मिळायचा. पण आता कंपनीने याऐवजी नवे प्लॅन्स सादर केले आहेत. नव्या प्लॅन्समध्ये मिळणारे फायदे कमी-अधिक प्रमाणात आहेत. पण या प्लॅन्ससाठी युजर्सना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. तर ‘जिओ’ची दरवाढ ६ तारखेपासून होणार आहे.