हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालाच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यातील भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कसबा पेठ येथे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे सुरुवातीपासूनच आघाडीवर दिसत आहेत. चौदाव्या फेरीअखेर त्यांनी 5 हजारहून अधिक मतांचे लीड मिळवले असून त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यातच आश्चर्याची बाब म्हणजे पुण्यातील पेठांच्या मतदारांनी सुद्धा धंगेकर यांना भरगोस मतदान केलं आहे.
पुण्यातल्या पेठा भाजपचा मतदान करतात असं म्हंटल जाते मात्र यावेंळी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्या पारड्यात याठिकाणी मतदान झाल्याने भाजपसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. तसेच पक्षाला चिंतन करायला लावणारी ही गोष्ट आहे. पुण्यातील शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ अल्पना टॉकीज, बुधवार पेठ, रविवार पेठ, गणेश पेठ, डोके तालीम, बोहरी आळी, रामेश्वर चौक, शुक्रवार पेठ, टिळक रस्ता या ठिकाणाहून धंगेकर यांना आघाडी मिळाली आहे. त्यामुळे भाजपसाठी हा चिंतेचा विषय आहे.
भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने यांच्यात मुख्य लढत होती. गेल्या अनेक वर्षांपासून कसबा पेठ येथे भाजपचा आमदार आहे. त्यामुळे या पोटनिवडणूकीत भाजप नेत्यांची प्रतिष्टा पणाला लागली होती. भाजप आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूच्या नेत्यांनी याठिकाणी प्रचार सभा आणि रॅलीने संपूर्ण मतदारसंघ ढवळून काढला होता. मात्र याठिकाणी सध्या भाजप पिछाडीवर आहे. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर टिळक कुटुंबाबाहेर उमेदवारी दिल्याने कसब्यातील ब्राह्मण समाज नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र पक्षात आणि ब्राहमण समाजात कोणतीही नाराजी नाही असं भाजप नेत्यांनी स्पष्ट केलं होते. मात्र तरीही भाजपचं गणित नेमकं कुठं फसलं याचा शोध आता पक्षाला घ्यावा लागेल.