वाई तालुक्यात विद्युत पुरवठा करणाऱ्या डी. पी. फोडून तांब्याच्या तारा लंपास, शेतकरी चिंताग्रस्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

कवठे (ता. वाई) येथील शेतीच्या पाणीपुरवठा करणारी डी. पी. फोडून त्यातील तांब्याच्या तारा पळविण्याचे सत्र सुरूच आहे. आतापर्यंत चोरट्यांनी 20 हून अधिका डी. पी फोडलेल्या आहेत. पोलिसांनी तातडीने या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. वारंवारं होणाऱ्या चोऱ्यामुळे परिसरातील शेतक-यांच्यात चिंतेचे वातावरण आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, कवठे येथील सुतारकी या शिवारातील शेती पाणी पुरवठ्यासाठी बसवण्यात आलेली अगदी अडचणीच्या ठिकाणी असलेली डी.पी. चे कनेक्शन चोरट्यांनी तोडले. मध्यरात्रीच्या सुमारास डी.पी. फोडून त्यातील अंदाजे 70 ते 80 किलो तांब्याच्या तारा चोरट्यांनी पळविल्या आहेत. विशेष म्हणजे ट्रान्सफर अडचणीत असल्याने व लोकवस्तीपासून दूर असल्याने या ट्रान्सफच्या सुरक्षिततेसाठी महावितरणने ट्रान्सफरला वेल्डिंग केलेले होते. चोरट्यांनी वेल्डिंग कटरच्या सहाय्याने कापून या डीपीला विद्युत पुरवठा करणा-या केबल्स तोडून टाकून सराईतपणे ही चोरी करण्यात आली आहे. या चोरीमुळे या डीपीवरून कनेक्शन असलेल्या 10 ते 15 विहिरींवरील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने व उन्हाची ताप वाढत असल्याने शेतक-यांना पिकांना पाणी देण्यास अडचण होत आहे. याबाबत या ठिकाणचा डी. पी. तात्काळ बसविण्यात यावा, यासाठी या परीसरातील शेतक-यांनी कवठे महावितरण येथे विनंती अर्ज केला आहे.

वर्षभरात कवठे, सुरूर, जोशी विहीर ते पांडे कँनाल या परिसरातील अंदाजे 20 च्या आसपास डी. पी. फोडण्यात आले असून तांब्याच्या तारांची चोरी करण्यात आलेली आहे. महावितरण व शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. एका चोरीच्या बाबत चोरांचा छडा लावण्यात भुईंज पोलिसांना यश आल्यानंतर काही काळ हा प्रकार बंद होता. मात्र आता पुन्हा या चो-यांचे सत्र सुरु झाले आहे. रात्रीच्या वेळी कोणी डी. पी. च्या आसपास संशयास्पद रित्या फिरताना आढळल्यास त्वरित महावितरणला कळविण्याचे आवाहन  महावितरणमार्फत करण्यात आले आहे. या चोरीबाबत भुईंज पोलीस स्टेशनमध्ये महावितरणच्या कवठे कार्यालातून तक्रार देण्यात आली असून स. पो. नि. आशिष कांबळे यांच्या  मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार धायगुडे अधिक तपास करीत आहेत.