औरंगाबाद – औरंगाबादमध्ये सध्या पाण्याचा मुद्दा गंभीर बनला आहे. या पाणी प्रश्नावरुन येत्या 23 मे रोजी भाजपने आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. दरम्यान, यावरुन एमआयएमचे नेते आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.
आज जलील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी औरंगाबदच्या पाणी प्रश्नावर भाष्य केलं. ”शहराचा पाणी प्रश्न खूप गंभीर झाला आहे. त्यावर बोलण्याची गरज आहे, ही मोर्चाची नौटंकी बंद करा. शहराचा पाणी प्रश्न अधिकाऱ्यांसोबत बसून सोडवण्याची गरज आहे. पण, भाजप त्याच्याशी काही देणं-घेणं नाही. त्यांना यातही राजकारण करायचं आहे,” असं जलील म्हणाले. ते पुढे म्हणाले की, “इतके वर्षे तुम्ही शिवसेनेसोबत महापालिकेत सत्ता भोगली, तेव्हा पाण्याचा प्रश्न मिटवला नाही. तेव्हा तुम्ही शिवसेनेसोबत लुटून खाल्ले, आता नौटंकी सुरू आहे. मी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देतो की, तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा. लोक तुम्हाला हंड्याने मारतील,” असंही जलील म्हणाले.
यावेळी जलील यांनी पाणीपट्टीचे पैसे परत करण्याची मागणी केली. “नागरीकांना पाणी पुरवठा न करता आजपर्यंत वसूल केलेली कोट्यावधीची पाणी पट्टीची रक्कम व्याजासह परत करावी. भाजप शिवसेनेसोबत महापालिकेत सत्तेत होती, मग त्यावेळेस हा प्रश्न का सोडवला नाही? तेव्हा पाणी पट्टी का माफ करण्यात आली नाही? जिल्हा प्रशासनाने तेव्हा पासून आजपर्यंत पाणी पट्टी वसुल न करता नागरीकांना पाणी पुरवठा होणेकरिता विविध उपाययोजना राबविणे गरजेचे होते, असे इम्तियाज जलील म्हणाले.