पुणे प्रतिनिधी | पुण्यातील कात्रज भागात सिंहगड शिक्षण संस्थेची संरक्षक भिंत कोसळून 6 मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी कोंढव्यात दुर्घटनेत पंधरा मजुरांचा मृत्यू झाला. बांधकाम व्यवसायावर नियंत्रण ठेवणारेे पुणे पालिकेतील भाजपची सत्ता आहे. भाजपच्या नियोजनशून्य कारभारामुळे, जाहिरातबाजी आणि सुशोभीकरणाचे लालसेपोटी प्रामाणिक कामाला तडा जात आहे. भाजपच्या चुुकीच्या कामामुळे अजून किती कामगारांचा बळी जाणार असा सवाल पुणे शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी केला.
आंबेगावात सिंहगड कॉलेज कॅम्पस परिसरात सोमवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. त्याची पाहणी करताना चाकणकर याठिकाणी आल्या होत्या. या दुर्घटनेमुळे बांधकाम प्रकल्पावर काम करणाऱ्या मजुरांना कोणत्या परिस्थितीत राहावं लागतं, याचं विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे. तीन इमारतींच्या मधे असलेल्या चिंचोळ्या जागेत हे मजूर त्यांच्या कुटुंबासह राहत होते. दुर्घटना घडली त्यावेळी सुरुवातीला इमारतीत असलेल्या होस्टेलमध्ये राहणारे विद्यार्थी या मजुरांच्या मदतीला धावले. त्यामुळे काहींचे प्राण वाचवणे शक्य झाले.