फाटलेल्या नोटा बदलून पूर्ण पैसे हवेत?? मग ही बातमी तुमच्यासाठीच …

नवी दिल्ली । बाजारातील दुकानदार अनेकदा आपल्याला फाटलेली नोट देतो. त्यावेळी आपली नजर त्याच्याकडे जात नाही. नंतर लक्षात आल्यावर ती नोट बाजारात कशी चालवावी? कोणाला द्यावी की बदलावी ? या विचाराने आपण अस्वस्थ होतो. मात्र यासाठी आता आपल्याला घाबरण्याची काहीच गरज नाही.आता फाटलेल्या नोटा कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेत सहजपणे बदलल्या जाऊ शकतात.

जर कोणत्याही बँकेने या नोटा बदलून देण्यास नकार दिल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. मात्र इथे हीगोष्ट लक्षात घ्या की, तुमच्या नोटेची स्थिती जितकी खराब असेल तितकी तिची किंमत कमी होईल. रिझर्व्ह बँकेने (RBI) अशा नोटा बदलून घेण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. ज्याची प्रत्येकाला माहिती असणे खूप महत्वाचे आहे.

असे आहेत RBI चे नियम

तुमच्याकडे 5, 10, 20 किंवा 50 रुपयांच्या कमी मूल्याच्या नोटा फाटल्या असतील तर अशा नोटांपैकी किमान अर्धी नोट असणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, तुम्हाला त्यासाठी पूर्ण पैसे मिळतील, अन्यथा तुम्हाला काहीही मिळणार नाही. म्हणजेच 10 रुपयांची फाटलेली नोट असेल आणि त्यातील 50 टक्के भाग सुरक्षित असेल तर त्या बदल्यात तुम्हाला 10 रुपयांच्या इतर चांगल्या नोटा मिळतील. जर फाटलेल्या नोटांची संख्या 20 पेक्षा जास्त असेल आणि त्यांची किंमत 5,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यासाठी शुल्क भरावे लागेल. नोट बदलण्याचा थेट नियम असा आहे की, जर गांधीजींचे वॉटरमार्क, RBI गव्हर्नरची स्वाक्षरी आणि सीरियल नंबर यांसारखे सुरक्षा चिन्ह दिसत असेल, तर बँका अशा फाटलेल्या नोटा बदलून देण्यास नकार देऊ शकत नाहीत.

एकापेक्षा जास्त तुकडे असलेल्या नोटा देखील बदलल्या जाऊ शकतात

नोटा अनेक तुकड्यांमध्ये विभागल्या गेल्या असतील तर त्या बदलण्याचाही नियम आहे. मात्र त्यासाठी जास्त वेळ लागतो. त्यासाठी ही नोट रिझर्व्ह बँकेच्या शाखेत पोस्टाद्वारे पाठवावी लागेल. रिझव्‍‌र्ह बँकेला आपला बँक खाते क्रमांक, शाखेचे नाव, आयएफएससी कोड, नोटेचे मूल्य याचीही माहिती द्यावी लागते.