हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर आपल्या पहिल्याच सिरीजमध्ये गौतम गंभीर (Gautam Gambhir) मोठा डाव टाकण्याची शक्यता आहे. आयपीएल मध्ये अष्टपैलू खेळाडू सुनील नारायणला सलामीला पाठवून गौतम गंभीरने नवी खेळी केली होती आणि नारायणने सुद्धा पहिल्या चेंडूपासून चौकार षटकार मारत समोरच्या गोलंदाजाला बॅकफूटवर ढकलण्याचे काम केलं होतं. गंभीर आता भारतीय संघात सुद्धा हाच बदल करण्याची शक्यता आहे. कोलकाता नाईट रायडर्ससाठी जे काम सुनील नारायण करायचा तेच काम आता भारतीय संघासाठी वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) करताना दिसू शकेल.
मीडिया रिपोर्ट्स नुसार, गौतम गंभीरने वॉशिंग्टन सुंदरला हार्ड हिटिंगची भूमिका दिली आहे. वॉशिंग्टन सुंदरला सलग दोन सत्रात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायला लावली आहे. महत्वाची बाब म्हणजे या दोन्ही सरावा दरम्यान वॉशिंग्टन सुंदरने फक्त चौकार आणि षटकारांचा सराव केला आहे. हे पाहता टॉप ऑर्डरमध्ये वॉशिंग्टन सुंदर पिंच हिटरची भूमिका बजावू शकतो, असा अंदाज लावला जाऊ शकतो. असं झाल्यास गौतम गंभीरने खेळलेला हा सर्वात मोठा मास्टरस्ट्रोक म्हणता येईल.
सुनील नारायण प्रमाणे वॉशिंग्टन सुंदर सलामीला आला तर यशस्वी जैस्वालला बाहेर बसावं लागू शकते. कारण दुसरा सलामीवीर शुभमन गिल हा उपकर्णधार आहे त्यामुळे त्याला बाहेर बसवलं जाण्याची शक्यता अजिबात नाही. त्यामुळे गौतम गंभीरचा फॉर्म्युला अंमलात आणला तर गिल आणि सुंदरची जोडी ओपनिंग करताना दिसू शकते. उद्या श्रीलंकेविरुद्व भारताचा पहिला T20 सामना असून दोन्ही संघ विजयासाठी उत्सुक आहेत. पल्लेकेले येथील स्टेडियमवर हा सामना आयोजित करण्यात आला असून रात्री ७ वाजता सामन्याला सुरुवात होईल. सूर्यकुमार यादव फुल्ल टाइम टीम इंडियाचा T20 कर्णधार झाल्यानंतर आणि गौतम गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर भारताचा हा पहिलाच दौरा आहे.