कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
गेल्या चार दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असल्याने नदीपात्रात मोठी वाढ होत आहे. कराड तालुक्यातील नदीकाठी असणार्या तांबवे गावाला या पुराच्या पाण्याचा फटका प्रत्येक वर्षी बसत असतो. कराड तालुक्यातील पूरग्रस्त म्हणून ओळखले जाणारे गाव तांबवे हे सलग दुसऱ्या दिवशी पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. तांबवे गावाला चारही बाजूंनी पाण्याने वेढले असून बाहेर जाण्यास आता मार्ग राहिलेला नाही.
चालू वर्षी गेल्या चार दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे आज (शुक्रवारी) सकाळी कोयना धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. सध्या कोयना धरणातून 50 हजार क्युसेस इतक्या क्षमतेने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. या सोडलेल्या पाण्यामुळे नदीकाठी असलेले तांबवे गाव पाण्याने चहुबाजूने वेढलेले आहे.
तांबवे गावातील मुख्य बाजारपेठ, कराड तांबवे मार्गावरील मुख्य मुख्य मार्गावरील तांबवे पूल तांबे वाडी तांबे कीर्तन हे सर्व मार्ग रस्त्यावर पाणी साचल्याने बंद झालेले आहेत. गुरुवारी दि. 22 जुलै रोजी रात्री या सर्व मार्गावरती पाणी आले होते. मात्र, आज सकाळी शुक्रवारी दि. 23 जुलै रोजी पाणी रस्त्यावरून व पुलावरून खाली गेल्याने पूराचे चित्र पाहायला मिळाले. मात्र दुपारी एक वाजल्यापासून कराड कोयना परिसरात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली असल्याने काही तासातच पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कराड-पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे कोयना- कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामध्ये आज कोयना धरणातून दोनदा पाण्याचा विसर्ग करण्यात आला असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे. दरम्यान, पाटण तालुक्यात शुक्रवारी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.