Monday, January 30, 2023

कराडजवळ NH- 4 महामार्गावर साचले पावसाचे पाणी; वाहतूक सुरु

- Advertisement -

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

गेल्या चार दिवसापासून सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पडत असलेल्या धुवाधार पावसामुळे पुणे- बेंगलोर महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी आलेले आहे. कराड शहराजवळील कोल्हापूर नाका येथील सागर हॉटेल समोरील NH-4 मार्गावरती एक ते दीड फूट पाणी साचले आहे. मात्र या ठिकाणी वाहनचालकांना कोणतीही सूचना मिळत नसल्याने वाहने अंधारात पाण्यात बिनधास्तपणे जात आहेत. येथे प्रशासनाने कोणतीही खबरदारी घेतलेली दिसून येत नाही.

- Advertisement -

पुणे -बेंगलोर महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. असे असताना महामार्ग पोलीस किंवा हेल्पलाइन तसेच कोणताही प्रशासनाचा कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नाहीत. त्यामुळे साचलेले पाणी वाहनचालकांच्या जीवावरती बेतू शकते. कोल्हापूर नाका ते ढेबेवाडी फाटा यादरम्यान शंभर ते दीडशे मीटर अंतरावर हे पाणी पसरलेले आहे.

पुण्याहून कोल्हापूरकडे जाताना या मार्गाचा वाहनचालक वापर करत असतात. तसेच NH-4 महामार्ग असल्यामुळे वाहने सुसाट असतात. परंतु पावसाच्या या साचलेल्या पाण्यामुळे एखाद्या वाहनचालकाच्या जीवावर बेतू शकते. साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने वाहने वाहनचालकांनी घातल्याने अनेक वाहने नादुरुस्त अवस्थेत उभी असल्याचे पाहायला मिळत आहेत.