औरंगाबादेत पाणीप्रश्न पेटला, मनपा आयुक्तांवर दोघांचा हल्ला, सुरक्षा रक्षकांच्या प्रसंगावधानामुळे आयुक्त बचावले; कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – हातात कागदी फलक घेऊन महापालिकेत दाखल झालेल्या दोघांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्यावर हल्ला चढवला. सुरक्षा रक्षकाने प्रसंगावधान राखल्याने आयुक्त बचावले. तुमचे प्रश्न संबंधितांना माहित असून ते सोडविण्याचा प्रयत्न सुरु आहे असे आयुक्तांनी सांगूनही ते दोघे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आरडा-ओरड व मोबाईलमध्ये विनापरवाना चित्रीकरण आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही घटना आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ अधिकारी कर्मचारी यांनी मनपात काम बंद आंदोलन केले. राहुल इंगळे व त्याचा साथीदार योगेश हरिशचंद्र मगरे (रा. सेक्टर – जे, एन -2, सिडको, मुकुंदवाडी, औरंगाबाद) असे मनपात गोंधळ घालणार्या त्या दोघांची नावे आहेत.

 

याविषयी अधिक माहिती अशी की, आज दुपारी दोन वाजेदरम्यान महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय कार्यालयीन कामकाज आटोपून दुपारच्या जेवणासाठी कार्यालयातून बाहेर पडत असताना राहुल इंगळे याने हातात एक कागदी फलक घेऊन आयुक्तांकडे देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी संबंधिताना त्यांचे प्रश्न माहित असून ते सोडविण्याचा प्रयत्न सुरु आहे असे सांगितले. तथापि संबंधिताने आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांना अडविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान राहूल इंगळे यांच्या सोबत असणाऱ्या योगेश हरिशचंद्र मगरे या व्यक्तीने अनधिकृत रित्या स्वतःच्या मोबाईलमध्ये या घटनेचे छायाचित्रीकरण करण्यास सुरुवात केली. यावेळी सुरक्षान रक्षकांनी त्यास समज दिली. तरीही संबंधिताने छायाचित्रीकरण सुरूच ठेवले.

 

दरम्यान राहुल इंगळे यांनी आरेरावीची भाषा करून आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या अंगावर धाऊन गेला. त्यावेळी सुरक्षा रक्षकाने प्रसंगावधान राखल्याने आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय बचावले. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी संबंधित दोन्ही व्यक्तींना ताब्यात घेऊन विचारणा केली असता संबंधितानी आरडा-ओरडा अरेरावीची उत्तरे दिली. यावेळी महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक शेकनाथ किसान तांदळे व सुखदेव केशव बनकर हे घटनास्थळी हजर होते.

 

राहुल इंगळे व त्याचा साथीदार असणाऱ्या योगेश हरिशचंद्र मगरे यांनी आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांच्यावर हल्ला करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, विनापरवाना शासकीय कार्यालयात छायाचित्रीकरण करणे, शासकीय कार्यालयाची शांतता भंग करणे इत्यादी बाबींसाठी सुरक्षा रक्षक शेकनाथ किसान तांदळे व सुखदेव केशव बनकर यांच्यामार्फत सिटी चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.