वाकुर्डे योजनेचे पाणी या आठवड्यात जुजारवाडी बंधाऱ्यापर्यंत येणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड: वाकुर्डे योजनेच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी व पिण्यासाठी नांदगाव, ओंड, मनव, काले, उंडाळे, टाळगाव येथील शेतकऱ्यांना होत असतो. या भागातील शेतकऱ्यांची मागणी होती कि हि योजना कार्यान्वित व्हावी जेणेकरून शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. सद्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात शेतासाठी पाणी गरजेचे आहेच त्याहीपेक्षा पिण्यासाठी पाणी गरजेचे आहे त्यामुळेच वाकुर्डेचे पाणी सोडण्यात यावे या मागणीच्या अनुषंगाने माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी वाकुर्डे, येणपे, महारुगडेवाडी, उंडाळे या प्रकल्प अधिकाऱ्यांची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह येथे घेतली व वाकुर्डे योजनेचे पाणी तात्काळ सोडण्याबाबत सूचना केल्या त्याप्रमाणे येत्या काही दिवसात वाकुर्डे योजनेचे पाणी जुजारवाडी बंधाऱ्यापर्यंत पोहचणार आहे. व दक्षिण मांड नदी पुन्हा एकदा वाहणार असल्याने शेतकऱ्यांच्यामध्ये समाधान व्यक्त होत आहे.

या आढावा बैठकीस जिल्हा परिषद सदस्य तथा रयत सह. साखर कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील तसेच प्रांताधिकारी उत्तमराव दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, टेम्भू उपसा सिंचन प्रकल्पचे कार्यकारी अभियंता रा. प. रेड्डीयार, वारणा कळवे विभागाचे कार्यकारी अभियंता डी.डी. शिंदे, टेम्भू प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता आबासाहेब शिंदे, मृदा व जलसंधारण विभागाचे इंजि. मि. सु. पवार, जलसंपदा विभागाचे इंजि. सतीश चव्हाण, कृष्णा कालवा विभागाचे उपविभागीय अधिकारी इंजि. सुधीर रणदिवे, महावितरणचे सहायक अभियंता इंजि. फिरोज मुलाणी आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते तसेच कराड दक्षिण काँग्रेस अध्यक्ष मनोहर शिंदे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, उदय पाटील (आबा), पै. नानासो पाटील, नरेंद्र पाटील, नितीन थोरात आदी यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, वाकुर्डे उपसा योजनेचे पाणी सोडले जावे अशी शेतकऱ्यांची मागणी होती. या भागातील शेतकऱ्यांना या पाण्याचा उपयोग शेतीसाठी, पिण्यासाठी होऊ शकतो. यामुळेच शेतकऱ्यांचा मागणीचा विचार करून वाकुर्डे योजनेचे पाणी तात्काळ सोडले जावे अश्या सूचना मी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

तसेच हे पाणी जुजारवाडी येथे जाईपर्यंत कोणीही पाणी उपसा करू नये यासाठी योग्य त्या उपाययोजना महावितरण अधिकाऱ्यांनी कराव्यात अश्या सूचना केल्या आहेत. कारण जर पाणी जुजारवाडी पर्यंत पोहोचण्याआधीच उचलले गेले तर पुन्हा पाण्याचा प्रश्न उदभवेल. जुजारवाडीपर्यंत पाणी पोहचले कि उंडाळे ल.पा.तलाव टाळगाव ल.पा.तलाव इथपर्यंत उलट पाणी साठवीत यावे जेणेकरून ऐन उन्हाळ्यात पाणी अपुरे पडणार नाही. तसेच जरी पाणी थोडे फार कमी पडले तर येवती येथील तलावात पुरेसा पाणीसाठा केला आहे व गरज पडली तर तोसुद्धा यामार्गाने सोडण्यात येईल अश्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.