सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
गावातील ग्रामस्थांना उरवल्या जाणाऱ्या पाण्याच्या टाकीतून एका बांधकामाला पाणी पुरविले जात असल्याचा धक्कादायक प्रकार सातारा तालुक्यातील आसनगाव येथे उघडकीस आला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाचा भोंगळ कारभार होत असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे मागील पंचवार्षिक पासून एकहाती सत्ता मिळाल्याने आजी-माजी सरपंचाचा मनमानी कारभार सध्या आसनगावात पाहायला मिळत आहे.
आसनगांव येथील पंचक्रोशी विद्यामंदिर शाळेच्या जवळील जागेमध्ये शासनाच्या अनुदानातून ग्रामपंचायतीमार्फत पिण्याच्या पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. मात्र, पिण्याच्या पाण्याचा पुरेसा वापर हा गावातील ग्रामस्थांना न होता तो एका खासगी बांधकामास केला जात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून येथील सरपंचांच्या जवळच्या व्यक्तींमार्फत ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये पाईप टाकून मोटारीच्या सहाय्याने खासगी बांधकामासाठी वापरले जात आहे. याची चांगलीच चर्चा गावात सध्या सुरु आहे.
आसनगाव ग्रामपंचायतीकडून दररोज अर्धा तास होणारा पाणी पुरवठा २० मिनिटे चालू राहील, असा संदेश गावातील ग्रामस्थांना मोबाईलद्वारे पाठविण्यात आला आहे. मात्र, असे असताना पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्येच मोटार टाकून बांधकामास वापर करण्याची परवानगी कोणी दिली? असा प्रश्न आता संतप्त ग्रामस्थ विचारू लागले आहेत. विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार चालू असून रोज पाणी सोडण्यास जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही हा प्रकार लक्षात आला कसा नाही. कि संबंधित कर्मचाऱ्यावर आजी-माजी सरपंच आणि ग्रामसेवकाकडून दबाव टाकला जातोय? असा प्रश्न ग्रामस्थांतून विचारला जात आहे.
गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीतून खासगी बांधकामास वापरल्या जात असलेल्या पाण्याबाबत सध्या ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट आहे. या प्रकरणी जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संबंधित शासकीय अधिकाऱ्याकडे ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.