सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
पुणे व सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर असलेले वीर धरण 82.53 टक्के भरलेले आहे. वीर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून पुढील 24 तासात धरणातून नीरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याचे फलटण नीरा उजवा कालवा विभागाचे अभियंता सं. रा. बोडखे यांनी त्याबाबतचे पत्र जारी केले आहे.
या पत्रात म्हटले आहे की, वीर धरण दिनांक 14 जुलै रोजी सकाळी 10 वाजता वीर धरणाची पाणी पातळी 578.32 मी. इतकी असून उपयुक्त पाणीसाठा 7.76 टीएमसी झाला असून धरण 82.53% इतके भरले आहे. वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सद्यस्थितीत संतत धार पाऊस पडत असून वीर धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे वीर धरणातून नीरा नदीमध्ये पुढील 24 तासात विसर्ग सुटण्याची शक्यता आहे. तरी नदी काठच्या लोकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेऊन कोणत्याही प्रकारची जिवीत व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
पाण्याचा विसर्ग होण्याबाबत खबरदारी म्हणून वीर धरण व्यवस्थापनाने सोलापूर, पुणेसह सातारा जिल्हाधिकारी यांना कळविले आहे. तसेच खंडाळा, फलटण, माळशिरस, पंढरपूर, बारामती व इंदापूर येथील तहसिलदार यांनाही माहिती दिली आहे.