भाजपचं नाव ‘भारत जलाओ पार्टी’ असं ठेवलं पाहिजे; ममता बॅनर्जींंचा पलटवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोलकाता । कोलकात्यामधील व्हिक्टोरिया मेमोरियल येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भाषणावेळी देण्यात आलेल्या घोषणाबाजीला यांनी कडाडून विरोध दर्शवला होता. दरम्यान, ममता बॅनर्जींनी हा प्रकार म्हणजे बंगालचा आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा अवमान असल्याचं म्हणत भाजपवर जोरदार टीका केली.

“व्हिक्टोरिया मेमोरिअल येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मला अपमान सहन करावा लागला. भाजपानं बंगालच्या प्रतिष्ठित लोकांचा यापूर्वीही अपमान केला आहे. आताही भाजपा तसंच करत आहे. भाजपचं नाव भारत जलाओ पार्टी असं ठेवलं पाहिजे,” असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा शाधला. हुगळीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान त्या बोलत होत्या. “आपला शिरच्छेद केला तरी चालेल पण आपण भाजपसमोर कधीही झुकणार नाही,” असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

दरम्यान, जर आपल्याला बंदुक दाखवली तर आपण बंदुकीचं संदुक दाखवू शकतो. परंतु आपण राजकारणावर विश्वास करतो, बंदुकीवर नाही, असंही त्या म्हणाल्या. “तुम्ही कोणाला घरी बोलावून त्याचा अपमान कराल का? ही बंगाल किंवा आपल्या देशाची संस्कृती आहे का? नेताजींच्या सन्मानार्थ घोषणा देण्यात आल्या असत्या तर मला काहीच वाटलं नसतं. परंतु मला डिवचण्यासाठी ज्याचा कार्यक्रमाशी काहीच संबंध नाही त्या घोषणा देण्यात आल्या. माझा देशाच्या पंतप्रधानांसमोर अपमान करण्यात आला,” असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’