हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते केएस ईश्वरप्पा यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. आम्हाला एकही मुस्लिम मत नको आहे, मुस्लिम मतांची आम्हांला गरज नाही असं वक्तव्य त्यांनी केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. शिवमोग्गा येथे वीरशैव-लिंगायत सभेत बोलताना केएस ईश्वरप्पा यांनी हे बेताल विधान केलं.
शिवमोग्गाजवळील विनोबा नगर येथे सभेला संबोधित करताना केएस ईश्वरप्पा म्हणाले, सर्व जातीधर्मातील लोकांशी चर्चा करून त्यांना विचारलं पाहिजे की भाजपच्या काळात तुम्हाला काय काय लाभ झाले. आपण ही माहिती घेतली पाहिजे. परंतु शहरात जवळपास 60 हजार मुस्लिम आहेत, आम्हाला त्यांच्या मतांची गरज नाही.
ते पुढे म्हणाले, असे सुद्धा अनेक मुस्लिम आहेत ज्यांना भाजप सरकारचा फायदा सुद्धा झाला आहे. त्यांना गरजेच्या वेळी मदत मिळाली आहे त्यामुळे ते आम्हाला मतदान करतील. राष्ट्रवादी मुस्लिम नक्कीच भारतीय जनता पक्षालाच मतदान करतील असेही केएस ईश्वरप्पा यांनी म्हंटल. तसेच भाजप सरकारमध्ये हिंदू सुरक्षित होते. हिंदूंवर हल्ला करण्याची कोणाची हिंमत नव्हती असेही त्यांनी म्हंटल.