अहमदनगर प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीत अत्यंत अटीतटीच्या झालेल्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात भाजपचे राम शिंदे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांच्यात दुरंगी लढत झाली. निवडणूकीच्या निकालासाठी काही तसाचा अवधी राहिलेला असताचा कर्जत जामखेड तालुक्यात रोहित पवार प्रचंड मतांनी निवडून आले असल्याचे डिजिटल फलक उत्साही कार्यकर्त्यांनी आधीच लावले आहेत. तर काही कार्यकर्त्यांनी डिजेसाठी ऍडव्हान्स दिला असुन काहींनी थेट सट्टा लावला आहे.
या प्रकारामुळे मतदारांमध्ये किती उत्साह संचारलाय ते वेगळं सांगायला नको. शरद पवार यांनी जेव्हा कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांच्या प्रचाराची सभा घेतली होती. तेव्हाच कर्जत-जामखेडचा निकाल लागलाय. आपलं ठरलंय. असं सांगून रोहित पवारांचा विजय होणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. सोबतच रोहितला फक्त निवडून देऊन चालणार नाही. तर, पुढच्या पाच वर्षांत त्याला प्रत्येक कामात साथ दिली पाहिजे असे आवाहन पवार यांनी सभेत केले होते. ‘आम्हाला बारामती बदलायला ५० वर्षे लागली. कर्जत-जामखेड बदलायला ५ ते ७ वर्षांपेक्षा जास्त काळ लागणार नाही,’ असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला होता.
येत्या २४ तारखेला कर्जत-जामखेडमध्ये भाजपचा राम शिल्लक राहणार नाही, असा टोला पवार यांनी मंत्री राम शिंदे यांना लगावला होता. त्यामुळे मतदानानंतर आता रोहित पवार यांचा विजय निश्चित मानून उत्साही कार्यकर्त्यांनी रोहित पवार यांच्या विजयाचे फलक लावून विरोधकांच्या काळजाचे ठोके वाढवले आहेत.