हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची जागा काँग्रेस साठी सोडण्यात आल्यानंतर शिवसेना नेते राजेश क्षीरसागर हे नॉट रीचेबल झाल्याचे पाहायला मिळत होते. मात्र आता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपला हरवण्यासाठी शिवसेना काँग्रेसच्या पाठीशी राहणार आहे असे त्यांनी म्हंटल. राजेश क्षीरसागर यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीला बळ मिळाले आहे.
मातोश्री हे आमच्यासाठी मंदिर आहे, शिवसेनाप्रमुखांचा आदेश हा आमच्यासाठी शिरसावंद्य आहे. पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार शिवसेना ही काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीशी राहील असं त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेची हक्काची जागा काँग्रेसला सोडल्याने शिवसैनिक नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न गेले दोन दिवस मी करत होतो, असं ते म्हणाले.
खरं तर कोल्हापूर उत्तर मतदार संघाच्या पोटनिवडणूकीत क्षीरसागर यांची निवडणूक लढवण्याची इच्छा होती. कार्यकर्त्यांचा तसा दबाव होता. परंतु महाविकास आघाडीच्या धोरणानुसार ही जागा दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव हे काँग्रेसचे असल्याने त्याच पक्षाच्या वाट्याला गेली. त्यानंतर नाराज झालेले क्षीरसागर नॉट रीचेबल होते. अखेर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.