Friday, June 9, 2023

खडसेंनी दिलेल्या पुराव्याच्या आधारावर संबंधित नेत्यांवर कारवाई करणार- सुधीर मुनगंटीवार

मुंबई प्रतिनिधी । भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर भाजपमध्ये सध्या खळबळ निर्माण झाली आहे. मात्र, याभेटीबाबत भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सूचक विधान केलं आहे. माध्यमांशी याबाबत बोलत असतांना एकनाथ खडसेंच्या मनात काय आहे जाणून घेण्याचा प्रयन्त भाजप करत आहे. तसेच त्यांच्या आम्ही संपर्कात असून त्यांचे जे काय मतभेद आहेत ते आम्ही दूर करू असे सांगितले.

काल भाजपाची कोअर कमिटीची बैठक मुंबई येथे पार पडली. याबैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि अन्य भाजपचे नेते उपस्थित होते. ‘एकनाथ खडसे यांच्याशी आम्ही चर्चा करत असून त्यांची जी काही नाराजी आहे ती आम्ही सोडवण्याचा प्रयन्त करत असून, तसेच विधानसभेच्या निवडणुकी दरम्यान पक्षविरोधात काम करणाऱ्या नेत्यांसंबंधी जे पुरावे खडसे यांनी दिले आहेत त्यासर्वाना पक्षातून बाहेरचा रास्ता दाखवला जाईल असा निर्णय बैठकीत घेतला असल्याचे’ मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

दरम्यान, काल मंगळवारी एकनाथ खडसे यांनी विधानभवनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. याभेटीनंतर मी शिवसेनेत जाणार नाही, मी भाजपावर नाराज नसून भाजपातील दोन-तीन नेत्यांवर नाराज आहे असं सांगत खडसे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. याआधी विधानसभेच्या निवडणुकी दरम्यान भाजपमध्ये राहून पक्षविरोधात काम करणाऱ्या नेत्यांचे माझ्याकडे पुरावे आहेत असा दावा खडसे यांनी केला होता. त्याचबरोबर या नेत्यांमुळेच भाजपाचे उमेदवार निवडणुकीत पडले असल्याचे त्यांनी सांगितले.