हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाची संपूर्ण संपत्ती दोन उद्योगपतींच्या हातात आहे. हे दोन उद्योगपती नरेंद्र मोदींसाठी २४ तास काम करतात. आणि मोदीही या दोन उद्योगपतींसाठी 24 तास काम करतात. या दोन उद्योगपतींशिवाय नरेंद्र मोदी पंतप्रधान राहू शकत नाहीत असं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. महागाईविरोधात काँग्रेसने दिल्लीतील रामलीला हल्लाबोल रॅली काढली. यावेळी ते बोलत होते.
राहुल गांधी म्हणाले, भाजप आणि आरएसएसचे नेते देशाचे विभाजन करतात आणि जाणूनबुजून देशात द्वेष आणि भीती निर्माण करतात. ते म्हणाले, हा द्वेषच भारताला कमकुवत करत आहे. बेरोजगारी, महागाई द्वेषातून मजबूत होते का ? असा सवाल करत नरेंद्र मोदी आणि भाजप देशाला कमकुवत करण्याचे काम करत आहेत असा थेट आरोप राहुल गांधींनी केला.
राहुल गांधींनी केंद्रीय तपास यंत्रणावरूनही केंद्रावर निशाणा साधला. विरोधी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांवर ईडी आणि सीबीआय लावली जाते. माझी ५५ तास चौकशी झाली. 55 तास काय, 500 तास, अगदी पाच वर्षे जरी चौकशी केली तरी मला त्याची पर्वा नाही. मी नरेंद्र मोदीजींना सांगू इच्छितो की मी तुमच्या ईडीला घाबरत नाही. असं प्रतिआव्हान राहुल गांधी यांनी मोदी सरकारला दिले.
यूपीए सरकारने शेतकरी आणि मजुरांसाठी अनेक गोष्टी केल्या. आम्ही मजुरांसाठी मनरेगा योजना आणली होती. मनरेगा हा गरिबांचा अपमान आहे, असे पंतप्रधान मोदी संसदेत म्हणाले. यूपीएची मनरेगा नसती तर भारतात आग लागली असती. “नरेंद्र मोदींनी आमची आर्थिक ताकद नष्ट केली आहे. 40 वर्षात बेरोजगारी सर्वाधिक आहे. यूपीए सरकारने 27 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले, पण मोदी सरकारने आठ वर्षांत 23 कोटी लोकांना गरिबीच्या खाईत लोटले आहे. पीठ, डाळी, पेट्रोल, तेलापासून सर्वच वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. भारतात सामान्य नागरिक संकटात आहेत, देश त्रस्त आहे. देशाला काँग्रेसच वाचवू शकते असं राहुल गांधी यांनी म्हंटल.