Weather Update | देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये पुन्हा एकदा पश्चिमी भागात थंडीचा जोर वाढला आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड (उत्तराखंड) आणि जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) तापमान मोठ्या प्रमाणावर घटले आहेत. यासह अनेक भाग बर्फाच्या आवरणाखाली गेले आहेत. तर, समतोल भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दुसरीकडे, मध्य भारत आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये हवामान तुलनेने स्थिर राहिले आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) उष्णतेचा तडाका जाणवायला सुरुवात झाली आहे.
देशभरामध्ये हवामानात मोठे बदल होत असताना महाराष्ट्रात मात्र हवामानाची विचित्र स्थिती पाहायला मिळत आहे. एका बाजूला कोकण किनारपट्टीवर तापमानाचा उच्चांक नोंदवला जात आहे. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातील निफाड येथे रात्रीचे तापमान ४ ते ५ अंश सेल्सियसपर्यंत घसरले आहे. राज्यातील तापमानातील हे बदल हवामान तज्ज्ञांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, राज्याच्या किनारपट्टी भागांत गेल्या २४ तासांत उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पारा ४० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे उष्माघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईसह कोकणात उष्णतेचा इशारा (Weather Update)
मुंबई आणि कोकण किनारपट्टीवरील शहरांमध्ये पुढील ४८ तासांत उष्णतेचा कहर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रविवारी आणि सोमवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या काळात शक्यतो घराबाहेर न पडण्याचा सल्ला नागरिकांना दिला जात आहे.
तापमानवाढीचे प्रमुख कारण काय?
राज्यातील वाढत्या तापमानामागे वाऱ्यांच्या दिशेत झालेला बदल हे एक महत्त्वाचे कारण मानले जात आहे. सध्या महाराष्ट्राच्या दिशेने येणाऱ्या पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव किनारपट्टी भागांवर मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. त्यामुळे या भागांतील तापमान झपाट्याने वाढत आहे.
उष्णतेपासून बचावासाठी काय करावे?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मार्च महिन्यात राज्यात उष्णतेच्या लाटांचे प्रमाण आणखी वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक उपायpयोजना करणे गरजेचे आहे.
- शक्यतो दुपारच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे.
- पुरेशा प्रमाणात पाणी व द्रव पदार्थांचे सेवन करावे.
- हलके आणि सैलसर कपडे परिधान करावेत.
- उन्हात थेट उभे राहण्याचे टाळावे आणि डोक्यावर टोपी किंवा ओढणी घालावी.
- उष्णतेचा अधिक प्रभाव जाणवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
पुढील काळात हवामान कसे राहणार?(Weather Update)
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही आठवड्यांत महाराष्ट्रातील उष्णतेचा प्रभाव अधिक तीव्र होणार आहे. खास करून कोकण आणि विदर्भातील तापमान ४० अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेशी जुळवून घेण्यासाठी नागरिकांनी वेळीच आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




