हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाच्या सुरवातीपासूनच सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी होत आहे. विधिमंडळात ओबीसी मुद्द्यांवरील सर्व ठराव हे संमत करण्यात आले आहे. मात्र, यावेळी झालेल्या चर्चेत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून ओबीसी आरक्षणाबाबत खोटी माहिती दिल्याचा आरोप केल्यानंतर भुजबळांनीही त्याला प्रतिउत्तर दिले. आमच्यावर आरोप करता मग एवढी वर्षे तुम्ही काय केलं? केंद्रात तुमची सत्ता आहे ना? असा सवाल भुजबळांनी उपस्थित करीत फडणवीसांवर हल्लाबोल केला.
मुंबईत पावसाळी अधिवेशन पार पडत आहे. दोन दिवसीय अधिवेशनात अनेक महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. यामध्ये विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप, टीका यांचा भडीमार केला जात आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुनगुंटीवार व पटोले यांच्यात खडाजंगी झाल्यानंतर फडणवीस व भुजबळ यांनीही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. सभागृहात बोलताना फडणवीस यांनी छगन भुजबळ यांनी सर्वांना पूर्ण सत्य सांगितलं नसून त्यांनी अर्धसत्य सांगितलं आहे. कोर्टाने काय म्हटलं हे सर्वांनी समजून घ्यावे. कोर्टाने सेन्सस डेटा बद्दल भाष्य केलेले नाही, असे फडणवीसांनी म्हंटले.
फडणवीसांच्या आरोपानंतर त्याला भुजबळांनीही प्रतिउत्तर दिले. त्यांनी विधानसभेत ओबीसींचा इम्पिरिकल डेटा केंद्र सरकारने देण्याची मागणी करीत ठराव मांडला. त्यानंतर तो संमत करण्यात आला. यावेळी भुजबळांनीही फडणवीसांनी केलेल्या आरोपांना प्रतिउत्तर दिले. ठरावाच्या समतीनंतर अधिवेशनाचे कामकाज काहीवेळेसाठी तहकूब करण्यात आले.