हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ”उदयनराजे यांना राज्यसभेत पाठवण्याची इतकी घाई पक्ष करेल असं वाटत नाही. उदयनराजे यांचं पक्षात फारसं योगदाना नाही. ते राष्ट्रवादी काँग्रेस सोडून पक्षात आले आणि निवडणुकीत पडले. त्यांच्या मतदारसंघात त्यांचे भाऊ वगळता भाजपचा इतर कुणी आमदारही जिंकू शकला नाही. त्यामुळं त्यांना राज्यसभेत पाठवण्याचा निर्णय झाला असेल असं वाटत नाही,” असं म्हणत राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी अप्रत्येक्षपणे राज्यसभेच्या उमेदवारीवर जोरदार दावा केला आहे. राज्यसभेच्या जागेसाठी भाजपाकडून उदयनराजे यांचं नाव निश्चित झाल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये संजय काकडे यांनी हे विधान केलं आहे.
येत्या एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या सात खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. राज्यसभेच्या जागेवर वर्णी लागावी म्हणून भाजपामध्ये रस्सीखेच सुरु आहे. महाराष्ट्रातून साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले व विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना राज्यसभेत पाठवणार असल्याचं बोललं जातंय. अमित शहा यांनी उदयनराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची चर्चा सुरु आहे. अशा परिस्थितीत खासदार संजय काकडे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन उद्यनराजेंना लक्ष करत राज्यसभेच्या जागेवर आपली दावेदारी ठोकली आहे.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.