वॉशिंग्टन । बुधवारपासून यूएस विमानतळांवर 5G मोबाईल टेक्नोलॉजीचा वापर सुरू होत आहे. अशा परिस्थितीत आज एअर इंडियाची विमाने अमेरिकेला जाणार नाहीत. एअर इंडियाने दिल्ली-न्यूयॉर्क, दिल्ली-सॅन फ्रान्सिस्को, दिल्ली-शिकागो, मुंबई-न्यू जर्सी फ्लाइट्स रद्द केली आहेत. 5G मुळे विमानांना होणाऱ्या अडचणींमुळे एअर इंडियाने फ्लाइट्सच्या वेळेत बदल केला तसेच विमानेही बदलली जाणार आहेत. केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना 5G संदर्भात याआधीच पत्र लिहिले होते. 5G टेक्नोलॉजीमुळे फ्लाइट्सना काय धोका आहे ते समजून घेऊयात:-
5G टेक्नोलॉजीमुळे एअरलाइन्सच्या फ्रिक्वेन्सीमध्ये बाधा येण्याची अपेक्षा आहे. याबाबत सुमारे 10 विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सरकारला पत्र लिहिले आहे. त्यानुसार विमान कंपन्या आणि टेलीकम्युनिकेशन इंडस्ट्री यांच्यात चर्चा सुरू आहे. या संवादानंतरच 5G तंत्रज्ञानाचे लॉन्चिंग काही दिवस पुढे ढकलण्यात आले. मात्र, आता ती वेळ या आठवड्यात संपुष्टात येत आहे.
असे मानले जात आहे की जर 5G टेक्नोलॉजी लागू केली तर सुमारे 1100 फ्लाइट्स रद्द होऊ शकतात. अमेरिकेच्या सर्व प्रमुख विमान कंपन्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून काही काळ स्थगिती देण्याची विनंती बिडेन प्रशासनाला केली आहे.
त्याचे परिणाम घातक ठरू शकतात, असा इशाराही विमान कंपन्यांनी दिला आहे. सुमारे 1 लाख प्रवाशांना याचा फटका बसू शकतो. याचा परिणाम केवळ प्रवाशांवरच होणार नाही, तर कार्गो फ्लाइट्सवरही होऊ शकतो.
एअरलाइन कंपन्या काय म्हणतात:-
1- आवश्यक सुधारणा न करता किंवा एविएशन इक्विपमेंटमध्ये बदल न करता 5G कार्यान्वित केल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते.
2- 5G टेक्नोलॉजीमुळे विमानाचे ऑल्टीट्यूड (उंची) मोजण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
3- विमानतळाभोवती 5G टेक्नोलॉजी मुळे धोकादायक समस्या उद्भवू शकतात
4- हे पाहता 5G टेक्नोलॉजी धावपट्टीपासून दोन मैलांच्या अंतरावर ठेवावी.
काही एअरलाईन्सच्या सीईओने अमेरिकन परिवहन सचिवांना पत्र लिहून म्हटले आहे – ‘जर 5G मध्ये आवश्यक अपग्रेड न करता किंवा एविएशन इक्विपमेंटमध्ये बदल न करता लागू केले तर मोठी दुर्घटना घडू शकते. 5G तंत्रज्ञानामुळे विमानाची ऑल्टीट्यूड मोजण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
एव्हिएशन रेग्युलेटर FAA ने सांगितले की,” त्यांनी ट्रान्सपॉन्डर्सला काही 5G सेक्टर्समध्ये ऑपरेट करण्याची परवानगी दिली आहे. 5G च्या C-बँडमुळे प्रभावित होणार्या 88 विमानतळांपैकी 48 विमानतळांना नवीन टेक्नोलॉजीसाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. या विमानतळांवरील अनसर्टिफाइड इक्विपमेंटमुळे हजारो फ्लाईट्स रखडण्याची भीती विमान कंपन्यांना आहे. युनायटेड एअरलाइन्सने सोमवारी सांगितले की,”सध्याच्या 5G वायरलेसमुळे एका वर्षात 15,000 फ्लाईट्स आणि 12.5 लाख प्रवासी प्रभावित होतील.”